महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज (५ मे २०२५) जाहीर झाला. महाराष्ट्र राज्याचा संपूर्ण निकाल ९१.८८ टक्के लागला. यंदा बारावीच्या निकालाच्या टक्केवारीत घट झाली आहे. तसेच दरवर्षीप्रमाणे यंदाही बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. विभागीय मंडळातून कोकण विभागानं बाजी मारली आहे. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता दहावीचा निकाल कधी जाहीर होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.
यंदा दहावी आणि बारावी दोन्हीही परीक्षा १० ते १२ दिवस लवकर झाल्या होत्या. त्यानुसार निकालही लवकर जाहीर होत आहेत. यंदा दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या काळात पार पडली होती. या परीक्षेनंतर बोर्डाने ठरवून दिलेल्या निश्चित वेळेत सर्व शिक्षकांनी उत्तरपत्रिकांची तपासणी केली. आता सध्या उत्तरपत्रिकांमध्ये कोणता प्रश्न तपासायचा राहिला आहे का?, उत्तरपत्रिकेवरील गुण आणि गुणपत्रिकेवर घेतलेले गुण बरोबर आहेत का?, याची पडताळणी युद्धपातळीवर सुरू आहे. या पडताळणीनंतर गुणपत्रिकांची छपाई सुरू होईल, अशी माहिती बोर्डातील अधिकाऱ्यांनी दिली होती.
बारावीचा निकाल आज जाहीर झाला असला तरी दहावीचे विद्यार्थी अद्याप निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल १५ ते २० मे पर्यंत जाहीर होऊ शकतो, असे म्हटलं जात आहे. परंतु बोर्डाने अद्याप याबद्दलची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही.