होळकर-गायकवाड राजघराण्यांच्या खजिन्यातील दुर्मिळ रत्नाचा लिलाव होणार; गोवळकोंडा ब्लू हिऱ्याचा इतिहास काय?
BBC Marathi May 05, 2025 09:45 PM
Christie's गोवळकोंडा ब्लू या मूल्यवान हिऱ्याचं इंदूरच्या राजघराण्याशी नातं आहे.

एकेकाळी इंदूरचे होळकर आणि मग बडोद्याचे गायकवाड या दोन मराठी राजघराण्यांच्या संग्रहात राहिलेला एक दुर्मिळ निळा हिरा लवकरच लिलावात विकला जाणार आहे. त्याचं नाव आहे 'द गोवळकोंडा ब्लू'.

जगभरात कुठल्याही लिलावात आलेल्या फिकट निळसर हिऱ्यांमध्ये गोवळकोंडा ब्लू हा आकारानं सर्वात मोठा आहे, अशी माहिती ख्रिस्टीज या लिलाव करणाऱ्या संस्थेनं दिली आहे.

हा हिरा 23.24 कॅरेट वजनाचा आहे आणि तो पिअरच्या (नासपती) आकाराचा किंवा पाण्याच्या थेंबाच्या आकाराचा आहे.

14 मे रोजी स्वित्झर्लंडच्या जिनिव्हामध्ये होणाऱ्या लिलावात हे रत्न विकलं जाणार आहे. त्याला 3 ते 5 कोटी अमेरिकन डॉलर्स म्हणजे सुमारे 250 ते 425 कोटी रुपये किंमत मिळेल असा अंदाज वर्तवला जातो आहे.

वैशिष्ट्यपूर्ण आकार, वजन आणि रंग यासोबतच गोवळकोंडा इथल्या खाणी आणि होळकर-गायकवाड राजघराण्यांशी नातं असल्यानं हे रत्न इतकं मौल्यवान ठरलं आहे.

नैसर्गिकरित्या अशी निळसर रंगछटा लाभलेले हिरे खूपच दुर्मिळ असतात.

जगभरातल्या खाणींमधून निघालेल्या हिऱ्यांपैकी केवळ 0.02 टक्के हिरे निळ्या रंगांचे असल्याचं तज्ज्ञ सांगतात. फिकट निळसर रंगाचे हिरे तर आणखीनच दुर्मिळ असतात.

त्यातही बहुतांश निळे हिरे हे 10 कॅरेटपेक्षा कमी वजनाचे असतात. पण गोवळकोंडा ब्लू हा त्यापेक्षा बराच मोठा आहे.

Christie's गोवळकोंडा ब्लू हा हिरा इंदूर ब्लू म्हणूनही ओळखला जातो.

"हा जगातल्या सर्वात दुर्मिळ आणि सर्वात खास हिऱ्यांपैकी एक आहे, गेल्या 100 हून अधिक वर्षांत या हिऱ्याच्या वजन आणि आकारात कोणताही बदल करण्यात आलेला नाही," अशी माहिती ख्रिस्टीजमध्ये जडजवाहीर विभागाचे आंतरराष्ट्रीय प्रमुख राहुल कडाकिया यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.

एरवी कोणत्याही हिऱ्याची किंमत त्याचा आकार, वजन आणि पारदर्शकतेवर ठरवली जाते. पण शेवटी त्या हिऱ्यामागची कहाणी, त्याचा इतिहास यांमुळे संग्राहकांना तो घ्यावासा वाटतो.

गोवळकोंडा ब्लूची कहाणीही अशीच रंजक आहे.

राजघराण्याचा वारसा

"आमच्याकडे असं कुठलंही रत्न येतं, तेव्हा आमचे तज्ज्ञ जगभरातल्या दिग्गज ज्वेलर्सशी संपर्क साधतात आणि त्यांच्या संग्रहात या हिऱ्याविषयी काही माहिती जतन करून ठेवलेली आहे का, हे तपासून पाहतात," असं राहुल सांगतात.

अशा तपासातूनच गोवळकोंडा ब्लू हिऱ्याची कहाणी प्रकाशात आली आहे.

Holkar Cultural Centre इंदूरच्या महाराणी संयोगिता देवी आणि महाराज यशवंतराव होळकर

इंदूर संस्थानाचे शेवटचे महाराज यशवंतराव होळकर द्वितीय यांच्यापासून ती कहाणी सुरू होते.

यशवंतराव यांच्या पत्नी संयोगिताबाई देवी या कागलचे प्रमुख राजाश्री दत्ताजीराव घाटगे यांच्या कन्या आणि नात्यानं कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांची चुलत बहीण होत्या.

शाहू यांच्या पुढाकारानं यशवंतराव आणि संयोगिता यांचा विवाह झाल्याचं सांगितलं जातं. त्या काळात जातीपातींच्या भिंती मोडणारा हा आंतरजातीय विवाह होता.

महाराज यशवंतराव आणि महाराणी संयोगिता यांनी बराच काळ परदेशात वास्तव्य केलं होतं. आधुनिक पाश्चिमात्य कलेचे ते भोक्ते होते.

1923 साली फ्रान्सची राजधानी पॅरीसमधल्या शोमे (Chaumet) या जवाहिऱ्यानं यशवंतराव यांच्या मागणीनुसार एक ब्रेसलेट घडवलं होतं.

त्या ब्रेसलेटमध्ये एक निळसर चमकदार हिरा जडवण्यात आला होता. हा हिरा यशवंतराव यांच्या संग्रहातला आणि गोवळकोंडा खाणीतून आल्याची नोंद आहे.

Holkar Cultural Centre महाराणी संयोगिता देवी यांचे मॉन्वेल यांनी फ्रान्समध्ये काढलेले चित्र.

10 वर्षांनी यशवंतरावांनी हाच हिरा वापरून मोबुसां (Mauboussin) या दुसऱ्या एका फ्रेन्च जवाहिऱ्याकडून संयोगिता देवींसाठी एक हार बनवून घेतला.

या हारात गोवळकोंडा ब्लू या निळ्या हिऱ्यासह एक मोठा पाचू जडवला होता. शिवाय दोन मोठे सफेद हिरे होते, जे इंदूर पिअर्स नावानं ओळखले जातात.

फ्रेंच चित्रकार बर्नार्ड बुते द मॉन्वेल यांनी तरुण वयातल्या महाराणी संयोगिता देवींचं एक चित्र काढलं होतं, ज्यात त्यांनी हा हिरेजडीत हार घातलेला दिसतो.

पुढे यशवंतराव होळकर यांनी जानेवारी 1947 मध्ये प्रसिद्ध अमेरिकन ज्वेलर हॅरी विंस्टन यांना हा निळा हिरा विकला. विंस्टन यांनी तो एका ब्रूचमध्ये (रत्नजडीत पिनमध्ये) बसवला आणि त्याच वर्षी जूनमध्ये बडोद्याच्या महाराजांना तो दागिना विकला.

हा तो काळ होता, जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं आणि हळूहळू संस्थानांचं विलिनीकरण होत होतं.

Christie's अंगठीत जडवलेला गोवळकोंडा ब्लू हिरा.

पुढे काही काळानं हॅरी विंस्टन यांनी पुन्हा हा निळा हिरा विकत घेतला आणि मग हिऱ्याच्या सध्याच्या मालकांना विकला, ज्यांनी तो आजवर सांभाळून ठेवला आहे.

पण आता हा हिरा JAR या ज्वेलर्सनी तयार केलेल्या एका अंगठीमध्ये बसवण्यात आला आहे

निळ्या रंगाच्या हिऱ्यांची वाढती मागणी

इतर सफेद किंवा पारदर्शक हिऱ्यांपेक्षा निळे हिरे अनेक कारणांनी वेगळे ठरतात. एकतर ते पृथ्वीच्या कवचाखाली खोलवर भागात तयार होतात आणि बोरॉनसारख्या रसायनामुळे या हिऱ्यांना विशिष्ट निळसर छटा मिळते.

त्यामुळे निळे हिरे अनेकदा वैज्ञानिकदृष्ट्याही महत्त्वाचे असतात. कारण ज्या भागात ते तयार होतात, तेवढ्या खोलवर आपल्याला जाता येत नाही.

तयार होत असताना त्या भागातली रसायनं आणि इतर गोष्टी या हिऱ्यांमध्ये अडकतात. काही कारणांनी हे हिरे कवचाच्या वरच्या भागात येतात तेव्हा आपण त्यांचा अभ्यास करू शकतो आणि पृथ्वीच्या अंतरंगांविषयी महत्त्वाची माहिती गोळा करू शकतो.

Reuters नोव्हेंबर 2023 मध्ये हा 17.61 कॅरट वजनाचा ब्लू रोयाल हिरा 43.8 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सना विकला गेला

जगभरात फारच थोड्या खाणींमध्ये निळे हिरे सापडले आहेत. त्यातले बरेचसे आंध्र प्रदेशात गोदावरी आणि कृष्णा नद्यांच्या खोऱ्यांदरम्यान कोलूर इथल्या खाणीमध्ये सापडले आहेत.

हा भाग गोवळकोंडा इथल्या राजांच्या अधिपत्याखाली होता आणि या खाणींमधल्या हिऱ्यांवर काम करणारा उद्योग गोवळकोंडा इथे वसला होता. त्यामुळे या खाणींमधले हिरे गोवळकोंडा डायमंड्स म्हणून ओळखले जातात.

कोलूरच्या खाणींचा समावेश जगातल्या सर्वात जुन्या हिऱ्याच्या खाणींमध्ये केला जातो. या खाणीतून कोहीनूर, ड्रेस्डेन ग्रीन आणि होप डायमंड यांसारखी रत्नं सापडली आहेत.

"गोवळकोंडा हा जगातला एकमेव असा भाग आहे जिथे वेगवेगळ्या रंगांचे हिरे सापडले आहेत – सफेद, हिरवा, गुलाबी आणि निळा. म्हणजे हा भाग खनिजांनी किती संपन्न असेल, याची कल्पना करा. गोवळकोंडा इथल्या हिऱ्यांना नेहमी चांगली किंमत मिळाली आहे," राहुल कडाकिया सांगतात.

'गोवळकोंडा ब्लू'चं वजन जगप्रसिद्ध '' पेक्षा निम्मं आहे. पण होप डायमंड गडद निळ्या शाईसारख्या रंगाचा आहे, तर गोवळकोंडा ब्लूची रंगछटा फिकट, हलकी आणि आकाशासारखी आहे.

निळ्या रंगाचे हिरे निसर्गतः फारच दुर्मिळ आहेत. 20 कॅरेटपेक्षा जास्त वजनाचे निळे हिरे आणखीनच दुर्मिळ असतात.

त्यामुळे संग्राहकांमध्ये या हिऱ्यांना जास्त मागणी दिसून येते. अलीकडच्या काळातले हे काही आकडेच पाहा.

हा गोवळकोंडा ब्लू सारखीच रंगसंगती असलेला पण 14.62 कॅरेट वजनाचा हिरा 2016 साली 5 कोटी अमेरिकन डॉलर्स (तेव्हाचे 380 कोटी रुपये) एवढ्या किमतीला विकला गेला होता.

तर 2022 मध्ये डी बियर्सच्या कलिनन ब्लू या हिऱ्याला 5.7 कोटी डॉलर्स मिळाले.

आता गोवळकोंडा ब्लू हा हिरा त्यापेक्षा जास्त किंमत मिळवेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.