Maharashtra Live Update : काँग्रेसला फोडण्याची आता गरजच राहिलेली नाही : अशोक चव्हाण
Sarkarnama May 05, 2025 11:45 PM
IND Vs Pak : आमच्यावर आक्रमण केलं तर आम्ही अणुबॉम्ब टाकू : पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे विशेष सल्लागाराची धमकी

आमच्यावर आक्रमण केलं तर आम्ही अणुबॉम्ब टाकायला मागंपुढं पाहणार नाही. आम्ही अणुबॉम्ब टाकला तर सर्वकाही नष्ट होईल, अशी धमकी पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे विशेष सल्लागार राणा सनासल्लाह यांनी दिली आहे.

Ashok Chavan : काँग्रेसमधील नेतृत्व दिशाहीन : अशोक चव्हाण

काँग्रेसला आता फोडण्याची गरजच राहिलेली नाही. कारण काँग्रेसमधील नेतृत्व हे दिशाहीन झालं असल्यामुळे लोकांना भविष्य दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे अनेक मातब्बर नेते आणि कार्यकर्ते काँग्रेसला सोडून अन्य पक्षात जात आहेत. त्यामुळे भाजपची ताकद वाढली पाहिजे, ही प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांची भूमिका योग्यच आहे. काँग्रेस नेतृत्वाच्या अपयशामुळे लोकं आपोआपच सोडून जात आहेत तसेच लोक काँग्रेसमध्ये राहण्यास उत्सुक नाहीत, असा दावा माजी मुख्यमंत्री तथा भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी केला आहे.

BJP NEWS : निधी वाटपाचा वाद शिवसेना-राष्ट्रवादीत, कोंडी मात्र भाजपची

सध्या निधी वाटपावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चांगलीच खडाजंगी सुरू आहे. लाडक्या बहिणींना पैसे देण्यासाठी सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विकास खात्याचा निधी वळवण्यात आल्याने वातावरण चांगलेच तापले. राज्याचे समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर तोफ डागली आहे. या वादात आता आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी उडी घेतली आहे. संविधान फाऊंडेशनच्यावतीने सामाजिक न्याय विभागाचा किती निधी वळवला याची श्वेत पत्रिका काढण्याची मागणी केली आहे..

Parinay Fuke : जातीय जनगणनेचे श्रेय ओबीसी महासंघाला : परिणय फुके

मोदी सरकारने जातीय जनगणना करण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून याचे श्रेय घेण्यासाठी विविध राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. काँग्रेस आणि भाजप दावे प्रतिदावे करीत आहेत. मात्र निर्णयाचे सर्व श्रेय भाजपचे आमदार व माजी राज्यमंत्री परिणय फुके यांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाला दिले. महासंघाने सातत्याने केलेला पाठपुरावा, आंदोलन, विविध ठरावांची दखल घेण्यात आली, यात राहूल गांधी यांचे योगदान शून्य आहे. काँग्रेसला ओबीसींची एवढाच पुळका वाटत होता तर दहा वर्ष सत्ता असताना राहूल गांधी जातीनिहाय जनगणना का केली नाही असाही सवाल त्यांनी केला.

HAL चा नवा नियम, २० किमी क्षेत्रात बांधकामासाठी लागणार परवानगी

ओझरच्या HAL विमानतळपासून 20 किलोमीटरवर अंतराच्या क्षेत्रात बांधकामासाठी परवानगी घ्यावी लागणार आहे. HAL च्या विमानतळावरून संरक्षण दलाच्या विमानांची ये जा असते. विमानतळाच्या जवळ होणाऱ्या बांधकामामुळे भविष्यात विमानतळाला अडथळा येण्याच्या शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. ओझरच्या विमानतळावरून व्हिव्हीआयपी फ्लाईट, एअर फोर्सच्या विमानांची चाचणी केली जाते.

Varsha Gaikwad : काँग्रेसला खाली करणं कॅसिनोत गेम खेळण्या इतपत सोप्प वाटतं का?

काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा खरमरीत समाचार घेतला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना काँग्रेसला खाली करणं हे मकाऊमधल्या कॅसिनोत गेम खेळण्या इतपत सोप्प वाटतं का? एका रात्रीत काँग्रेस खाली होईल? असं त्यांना वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे.पक्ष संपवण्याची भाषा कोणी करू नये असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

Pahalgam attack : दहशतवाद्यांना मदत केल्याचा संशय असलेल्या तरुणाने जीवन संपवलं

पहलगाम हल्ल्यानंतर त्यासंबधी एक महत्वाची व धक्कादायक बातमी समजते आहे. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना मदत केल्याचा संशय असणाऱ्या तरुणाने जीवन संपविल्याचे वृत्त आहे. इम्तियाज मगरे असे जीवन संपविणाऱ्या तरुणाचे नाव आहे. काश्मीरमधील विश्वा नदीत उडी मारून त्याने जीवन संपवलं आहे. त्याच्यावर दहशतवाद्यांना अन्न पुरवल्याचा संशय असल्याचं म्हटलं जात आहे.

अजितदादांनी काय पैसे घरी नेले नाहीत : हसन मुश्रीफांचा संजय शिरसाटांना सल्ला

संजय शिरसाट यांनी केलेलं वक्तव्य चुकीचं आहे. ते माझे चांगले मित्र आहेत. मात्र ते नव्याने मंत्री झाले आहेत. त्यांनी आधी वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी घेऊन बसला हवं होतं. वस्तुस्थिती समजून घ्यायला हवी होती. यातून जर त्यांचा समाधान झालं नाही तर ते मुख्यमंत्र्यांना भेटू शकले असते. कोणतीही माहिती न घेता प्रसार माध्यमाच्या समोर येणं आणि आपल्याच ज्येष्ठ नेत्याला अशी उपमा देणं हे अयोग्य आहे. अजित दादा काय आकाशातून पैसे आणणार आहेत का? हे पैसे अजित दादांनी घरी नेले नाहीत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच लाडकी बहीण योजना यशस्वी झाली आहे.

सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला दिलासा; अक्षय शिंदे प्रकरणी FIR ची गरज नाही

अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी नव्याने FIR दाखल करायची गरज नाही. SIT पोलीस महासंचालकांच्या देखरेखीखाली काम करेल. अक्षय शिंदेंच्या कुटुंबीयांनी स्वतः याचिका मागे घेतली आहे, त्यामुळे त्यांना नोटीस जारी करण्याची आवश्यकता नाही. पोलीस महासंचालक SIT स्थापन करतील. अधिकाऱ्यांची निवड पोलीस महासंचालक करतील. तक्रारदार मजिस्ट्रेट किंवा सत्र न्यायालयात दाद मागू शकतात, असे म्हणत अक्षय शिंदे प्रकरणात सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निकाल बदलला आहे.

आरोग्य मंत्र्यांची खुर्ची संकटात... खात्यात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप

राज्याच्या आरोग्य विभागात मोठ्या भ्रष्टाचारा आरोप होत आहे. तब्बल 62 कोटींच्या टेंडरमध्ये घोळ घातल्याचा आरोप होत आहे. दोनच कंत्राटदारांना प्राधान्य देण्यात येत असल्याचा दावा होत आहे.

बारावीच्या निकालात कोकणची बाजी

बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना निकालपत्र मिळणार आहे. यंदा बारावीच्या निकाल 91 टक्के लागला आहे. यामध्ये कोकणने बाजी मारली असून कोकण विभागाचा निकाल तब्बल 96.74 टक्के लागला आहे.

पाकिस्तानला धडा शिकवण्याची वेळ : असदुद्दीन ओवैसी

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला समजवण्याची नाही तर धडा शिकवण्याची वेळ आली आहे, असे वक्तव्य एमआयएमचे प्रमुख असदुद्दीने ओवैसी यांनी केले आहे. पाकिस्तान हे निर्लज्ज आणि अपयशी राष्ट्र आहे. त्यांना शिक्षा देण्याची वेळ आली असल्याचेही ओवैसी म्हणाले.

मुळशी बंदची हाक

मुळशीतील पौडमधील मंदिरात देवीच्या मुर्तीच्या विटंबना करणाऱ्यावर कडक करावई करावी, यामागणी आज (सोमवार) मुळशी बंदची हाक देण्यात आली आहे. पौडमध्ये व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेऊन या बंदला प्रतिसाद दिला आहे.

लवकरच भाजप शिंदेंची शिवसेना फोडेल - संजय राऊत

महायुतीमध्ये सगळं काही ठिकठाक चाललेल नाही. तिन्ही पक्ष एकमेकांना गिळायला बसलेत. लवकरच भाजप एकनाथ शिंदेंचा पक्ष फोडेल, असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

BJP Vs Congress : काँग्रेस पक्ष फोडा, रिकामा करा! चंद्रशेखर बावनकुळेंचा विधानानं खळबळ

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या एका विधानानं राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. काँग्रेसला फोडा आणि पक्ष रिकामा करा, असा कानमंत्र बावनकुळेंनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिला आहे. पुणे जिल्हा भाजपच्या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांनी बोलताना हे वक्तव्य केले आहे.

Solapur Update : सोलापूर महापालिकेच्या बीफ मार्केट आणि कत्तलखाना बांधण्याच्या जाहिरातीमुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

सोलापूर महापालिकेच्या बीफ मार्केट आणि कत्तलखाना बांधण्याच्या जाहिरातीमुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. आमदार देवेंद्र कोठे यांनी हिंदुत्ववादी संघटनांशी चर्चा करत, इथं मटण मार्केट होणार असल्याचे सांगितलं. कोणत्याही परिस्थितीमध्ये बीफ मार्केट होऊ देणार नसल्याचे आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगताना, महापालिकेकडून प्रिंटिंग मिस्टेकमुळे बीफ मार्केट उल्लेख झाला. त्याबाबत लवकरच महापालिका शुद्धीपत्रक काढणार असल्याचे सांगितले जाते.

Chandrakant Navghare : 'असे धंदे करू नका, शिक्षकांना पैसे मागू नका'; राष्ट्रवादीचा आमदार शिक्षण विभागावर संतापला

शिक्षकांच्या थकीत वेतनासाठी शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून शाळेतील मुख्याध्यापकांना पैशाची मागणी होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. हिंगोलीच्या वसमत विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चंद्रकांत नवघरे शिक्षण अधिकाऱ्यांच्या या प्रकारावर चांगलेच भडकले आहेत. असे धंदे करू नका, शिक्षकांकडून पैसे खाऊ नका, अशी तंबी आमदार नवघरे यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना दिली आहे.

Mahayuti Government : नागपूर, नाशिक, धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसाठी महायुती सरकार 750 कोटींचे अर्थसाह्य देणार

नागपूर, नाशिक, धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचा परवाना वाचवण्यासाठी शेवटीची संधी म्हणून, या बँकांना सुमारे 750 कोटींचे अर्थसाह्याचा हातभार देण्याच्या हालचाली महायुती सरकार दरबारी सुरू आहे. संचालक मंडळाच्या मनमानी कारभारामुळे या तिन्ही जिल्ह्यातील मध्यवर्ती बँका अडचणीत आहेत.

Pahalgam Attack : भारतीय जहाजांना पाकिस्तानात बंदी

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानावर जहाजबंदी केल्यानंतर पाकिस्ताननेही भारतीय ध्वजधारी जहाजांना त्यांच्या बंदरांमध्ये प्रवेश करण्यास बंदी घातली. पाकिस्तानातून येणाऱ्या वस्तूंच्या आयातीवर आणि पाकिस्तानी जहजांच्या बंदरांमध्ये प्रवेशावर भारताने बंदी घातली आहे.

Pahalgam Terror Attack : हवाई दलप्रमुख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच भेट घेतली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावामुळे सुरक्षा परिस्थितीवर दोघांनी भेट महत्त्वाचे ठरते. या दोघांमध्ये सुरक्षाच्या दृष्टीने गंभीर मुद्यांवर चर्चा झाली.

Jammu and Kashmir Army jawan accident : लष्कराचा ट्रक 700 फूट दरीत कोसळला; तीन जवानांचा मृत्यू

जम्मू-काश्मीरमधील रामबन जिल्ह्यात लष्कराचे वाहन दरीत कोसळून झालेल्या अपघातात तीन जवानांचा मृत्यू झाला. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर ही अपघात झाला. बॅटरी चष्माजवळ जात असताना लष्कराचा ट्रक 700 फूट दरीत कोसळला.

Accident News : कर्नाळा घाटात खासगी बसचा भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू, तर 19 जण जखमी

कर्नाळा अभयारण्यमधील घाटात रविवारी रात्री खासगी बसला झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला, तर 19 जण जखमी आहेत. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला आहे. पनवेलवरून रायगडच्या दिशेला जाणाऱ्या मार्गिकेवर हा अपघात झाला. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.