कुंभार पिंपळगाव - गावासह परिसरात यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी केळीची लागवड केली आहे. दरम्यान सोमवारी (ता. पाच) दुपारी चार वाजेच्या सुमारास तासभर झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाला आलेला घास हिरावला गेला आहे. शासनाने पाहणी करावी अशी मागणी होत आहे.
गाव परिसरात यंदा केळीची मोठी लागवड आहे. डाव्या कालव्याला पाणी असल्याने अनेक शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी जुलै महिन्यात केळीची लागवड केली होती. आता केळीचे पीक बहरात असून घडे लगडलेली आहेत.पुढच्या महिन्यात केळी उतरायला येणार होत्या.
उन्हाळ्यात तळहाताच्या फोडाप्रमाणे पिकाला जपुन खत, औषधी, पाणी व्यवस्थापन करून पीक जगवली, वन्य प्राण्यांपासून रक्षण करण्यासाठी शेतात रात्रीची गस्तही सुरू केली. दरम्यान सोमवारी झालेल्या वादळी वाऱ्याने केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. झाडे अर्ध्यातुन तुटली, घड तुटुन पडली, झाडाला पान राहिलं नाही, पूर्ण पाने फाटुन गेली यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले.
शासनाने पाहणी करावी
गेल्या वर्षी जुलै महिन्यात दोन हजार २०० झाडांची लागवड केली. पुढच्या महिन्यात झाडे उतरायला येणार होती मात्र वादळी वाऱ्याने झाडे तुटुन गेली, घडही तुटुन पडले. यामुळे मोठे नुकसान झाले. शासनाने नुकसानीचे पंचनामे करावेत.
- दत्ता देशमुख, शेतकरी कुंभार पिंपळगाव