भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. भारताने यासह पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. ऑपेरशन सिंदूरंनतर आता भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव आणखी वाढला आहे. या तणावाचा परिणाम आयपीएल 2025 मधील काही सामन्यांवर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारताच्या एअर स्ट्राईकमुळे हिमाचल प्रदेशमधील धर्मशाळा क्रिकेट स्टेडियममध्ये आयपीएल 2025 मधील उर्वरित सामने होणार नसल्याचं म्हटलं जात आहे. एचपीसीएच्या या स्टेडियममध्ये गुरुवारी 8 मे रोजी पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यातील सामना रद्द होणार, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
तसेच 8 मे नंतर 11 मे रोजी याच स्टेडियममध्ये पंजाब विरुद्ध मुंबई यांच्यात सामना होणार आहे. मात्र हे 2 सामने या स्टेडियममध्ये होणार की नाहीत? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती बीसीसीआय किंवा आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलकडून देण्यात आलेली नाही. याबाबत हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी केंद्र सरकारकडून कोणतेही आदेश नसल्याचं स्पष्ट केलं आहे.