गुजरात टायटन्सने आयपीएल 2025 मधील 56 व्या सामन्यात मुंबईवर मात केली. गुजरातने या सामन्यात शेवटच्या बॉलवर 1 धाव करुन थरारक विजय मिळवला. गुजरातने अशाप्रकारे डीएलएसनुसार मुंबईवर 3 विकेट्सने मात केली. पावसामुळे हा सामना 14 आणि 18 व्या ओव्हरनंतर थांबवण्यात आला होता. त्यामुळे गुजरातला 19 ओव्हरमध्ये 147 धावांचं सुधारित आव्हान मिळालं. हा सामना शेवटच्या बॉलपर्यंत गेला. गुजरातला विजयासाठी शेवटच्या बॉलवर 1 रनची गरज होती. तेव्हा गुजरातने 1 धाव पूर्ण करत सनसनाटी विजय साकारला. गुजरात टायटन्स टीमने यासह सलग 6 सामने जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सचा वानखेडे स्टेडियममध्ये विजय रथ रोखला. गुजरातचा हा या मोसमातील एकूण आठवा तर मुंबई विरुद्धचा दुसरा विजय ठरला. तर मुंबईचा हा 12 सामन्यांनंतर पाचवा पराभव ठरला.
गुजरातने मुंबईवर मात करत 16 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली. मुंबईला या पराभवामुळे मोठा झटका लागला. मुंबईची पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानी घसरण झाली. तसेच मुंबईचं या पराभवामुळे प्लेऑफचं समीकरण बिघडलं. त्यामुळे मुंबईला आता उर्वरित सर्व सामन्यांमध्ये विजय मिळवावा लागणार आहे.
मुंबईने आतापर्यंत एकूण 12 सामने खेळले आहेत. मुंबईने 12 पैकी 7 सामने जिंकले आहेत. तर 5 वेळा पराभूत व्हावं लागलं आहे. मुंबई 14 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानी आहे. मात्र मुंबईच्या नेट रनरेटमुळे काही प्रमाणात दिलासा आहे. मुंबईचा नेट रनरेट हा इतर सर्व संघांच्या तुलनेत सर्वोत्तम आहे. मुंबईचा नेट रनरेट हा +1.156 असा आहे.
आयपीएल 18 व्या मोसमातून चेन्नई सुपर किंग्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद या 3 संघांचं पॅकअप झालं आहे. त्यामुळे उर्वरित 7 संघांमध्ये प्लेऑफमधील 4 जागांसाठी चुरस आहे. मात्र अद्यापही प्लेऑफसाठी कट ऑफ निश्चित झालेलं नाही. मात्र सद्यस्थिती पाहता प्लेऑफसाठी किमान 18 गुण बंधनकारक आहेत. मुंबईच्या खात्यात 12 सामन्यानंतर 14 पॉइंट्स आहेत. आरसीबी आणि गुजरातच्या खात्यात 16 तर पंजाबच्या खात्यात 15 गुण आहेत.
मुंबईसमोर आता उर्वरित 2 सामन्यांमध्ये पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिट्ल्सचं आव्हान असणार आहे. विशेष म्हणजे हे 2 संघही प्लेऑफच्या शर्यतीत आहेत. त्यामुळे मुंबईसाठी हे दोन्ही सामने आव्हानात्मक असणार आहेत. मुंबई विरुद्ध पंजाब सामना 11 मे रोजी धर्मशाळा येथे खेळवण्यात येणार आहे. तर 15 मे रोजी मुंबई वानखेडे स्टेडियममध्ये दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध 2 हात करणार आहे. हे दोन्ही सामने पलटणसाठी करो या मरो असे असणार आहेत.