Pimpri News : आईच्या डोळ्यांदेखत सहा वर्षीय मुलाचा मृत्यू
esakal May 06, 2025 05:45 AM

पिंपरी - कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी सहा वर्षीय मुलाला सोबत घेऊन आई वडापावची गाडी चालवते. नेहमीप्रमाणे ते वडापावच्या गाड्यावर असताना मुलगा थोडा बाजूला गेला आणि तिथेच घात झाला.

कारण, भरधाव बुलडोजरची त्याला धडक बसली अन् आईच्या डोळ्यांदेखत मुलाचा मृत्यू झाला. ही हृदय पिळवटून टाकणारी घटना पुणे-नाशिक महामार्गावर मोशी-प्राधिकरणातील राजा शिवछत्रपती चौकात (गोदाम चौक) घडली.

ऋषिकेश जयदेव खराडे (वय-६, रा. मोशी, मूळगाव नागापूर, ता. जि. बीड) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. त्याच्या ३८ वर्षीय मावशीने एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी बुलडोजरचालक राहुल श्रीरामचंद्र यादव (वय-२६, रा. मोहननगर, भोसरी, मूळ राहणार उत्तरप्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक केली आहे.

पोलिस उपनिरीक्षक बालाजी जोनापल्ले यांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी महिलेच्या बहिणीचा गोदाम चौकालगत वडापाव विक्रीचा गाडा आहे. त्या नेहमीप्रमाणे रविवारी (ता. ४) वडापाव विक्रीचा व्यवसाय करत होत्या. त्यांच्यासोबत ऋषिकेशही होता. तो जवळच असलेल्या भाजीपाला विक्रेत्याकडे कोथिंबीर आणण्यासाठी गेला. त्याचवेळी भरधाव बुलडोजरची ऋषिकेशला जोरदार धडक बसली. त्यात तो गंभीर जखमी झाला. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

ऋषिकेश एकुलता एक

खराडे दाम्पत्याला तीन मुली आहेत. ऋषिकेश सर्वात लहान होता. घरात तो सर्वांचा लाडका होता. मात्र, अचानक काळाने घाला घातला आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. ऋषिकेशवर त्याच्या मूळगावी अंत्यसंस्कार केले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.