पहलगाममधील हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून एअर स्ट्राईक केला आहे. भारताने पाकिस्तानच्या 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले आहेत. ऑपरेशन सिंदूर असे या एअर स्ट्राईकला नाव देण्यात आले होते. यानंतर आता पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. पाकिस्तानात ठिकठिकाणी आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत पाकिस्तानातील एक टीव्ही अँकर लाईव्ह शोमध्ये रडत असल्याचे दिसत आहे. यावरुन आता समाजवादी पक्षाचे नेते आयपी सिंह यांनी जोरदार टीका केली आहे.
समाजवादी पक्षाचे नेते आयपी सिंह यांनी त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवरुन एका पाकिस्तानी अँकरचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत पाकिस्तानातील एक टीव्ही अँकर जोरजोरात रडताना दिसत आहे. आमची तक्रार अल्लाकडे करु नका. उलट आमच्यासारख्या कमजोर लोकांना अल्लाहने ताकद द्यावी, अशी प्रार्थना करा, असे ही पाकिस्तानी अँकर रडत बोलताना दिसत आहे.
यावर सपा नेते आईपी सिंह यांनी कमेंट केली आहे. “पाकिस्तानातील टीव्ही अँकर, आता तुम्हाला रडू येतंय. जे लोक आमच्या महिलांच्या कपाळावरील कुंकू पुसतील, त्यांची हीच अवस्था केली जाईल. भारत दहशतवादाचे सर्व निशाण पुसून टाकेल”, असे सपा नेते आयपी सिंह यांनी म्हटले आहे. मात्र हा व्हिडीओ खरंच पाकिस्तानच्या अँकरचा आहे का याची पृष्टी टीव्ही 9 मराठी करत नाही.
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील शाळांनाही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त, पाकिस्तानने प्रमुख विमानतळांवर आणीबाणी घोषित केली आहे. पाकिस्तानातील अनेक विमानतळे बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे आकाशातील विमानांची वर्दळ थांबली आहे. इस्लामाबाद, कराची, लाहोर, मुल्तान, फैसलाबाद, स्कार्दू आणि पेशावर यांसारख्या विमानतळांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. अनेक परदेशी विमान कंपन्यांनी पाकिस्तानकडे जाणारी उड्डाणे रद्द केली आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे