IPL 2025 : चेन्नई सुपर किंग्सने तीन सामन्यांसाठी टीममध्ये केला बदल, 28 चेंडूत शतक ठोकणाऱ्या खेळाडूची एन्ट्री
GH News May 05, 2025 10:08 PM

आयपीएल 2025 स्पर्धेच्या प्लेऑफच्या शर्यतीतून चेन्नई सुपर किंग्स हा बाद होणारा पहिला संघ ठरला आहे. आतापर्यंत खेळलेल्या 11 पैकी 9 सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं आहे. त्यामुळे गुणतालिकेत सर्वात शेवटच्या स्थानी आहे. त्यामुळे आता तीन औपचारिक सामने खेळायचे आहेत. असं असताना चेन्नई सुपर किंग्सने भविष्याच्या दृष्टीकोनातून खेळाडूंची चाचपणी सुरु केली आहे. कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे स्पर्धेतून मुकल्यानंतर आयुष म्हात्रेला संघात घेतलं. त्याने आपल्या फलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध 94 धावांची खेळी केली. आता अशीच एक एन्ट्री चेन्नई सुपर किंग्स संघात झाली आहे. चेन्नई सुपर किंग्सचा युवा विकेटकीपर फलंदाज वंश बेदी दुखापतीमुळे आयपीएल 2025 स्पर्धेतून आऊट झाला आहे. वंश बेदीला डाव्या गुडघ्याचं लिगामेंट फाटल्याने त्याला आराम दिला गेला आहे. तसं पाहीलं तर वंश एकही सामना खेळला नव्हता. पण त्याच्या जागी चेन्नई सुपर किंग्सने गुजरातसाठी खेळणाऱ्या विकेटकीपर फलंदाज उर्विल पटेलला सहभागी केलं आहे. उर्विल पटेलने देशांतर्गत टी20 स्पर्धा सय्यद मुश्ताक अली 2024-25 स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली होती.

उर्विल पटेल हा आयपीएल 2025 मेगा लिलावात अनसोल्ड राहिला होता. पण देशांतर्गत क्रिकेटमधील त्याची कामगिरी कोणीही विसरू शकत नाही. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024-25 स्पर्धेत त्याने त्रिपुराविरुद्ध 28 चेंडूत शतक ठोकलं होतं. यानंतर टी20 मध्ये सर्वात वेगवान शतक ठोकणारा भारतीय फलंदाज ठरला होता. भारतासाठी लिएस्ट एमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा मानही त्याच्याकडे आहे. त्याने 2023 मध्ये विजय हजारे ट्रॉफीत अरुणाचल प्रदेशविरुद्ध 41 चेंडूत शतक ठोकलं होतं. उर्विल पटेल 47 टी20 सामन्यात 26 च्या सरासरीने 1162 धावा केल्या आहेत. यात चार अर्धशतकं आणि दोन शतकांचा समावेश आहे. त्याचा स्ट्राईक रेट 170.38चा आहे.

ट्रायल सेशनमध्ये भाग घेतला होता

ऋतुराज गायकवाड दुखापतग्रस्त झाल्यानंतर त्याच्या जागी एका खेळाडूची निवड करायची होती. तेव्हा तीन खेळाडूंची ट्रायल सेशनमध्ये भाग घेतला होता. ही ट्रायल सेशन 27 आणि 28 एप्रिलला चेन्नईत झाली होती. यासाठी आयुष म्हात्रे आणि उर्विल पटेल यांना बोलवलं होतं. पण ऋतुराजच्या जागी आयुष म्हात्रेला संधी मिळाली. पण उर्विलला नशिबाची साथ मिळाली आहे. आता प्लेइंग इलेव्हनध्ये संधी मिळते की नाही पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कारण विकेटकीपर बॅट्समन असल्याने धोनीच्या जागी संधी मिळणं कठीण आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.