- अश्विनी देव, editor@esakal.com
मराठी साहित्यात वेगवेगळे वातावरण अर्थातच व्यवसाय किंवा नोकरीमुळे निर्माण झालेले जग, तसेच विविध विषय वेगवेगळ्या फॉर्ममध्ये येत असतात. सिद्धहस्त लेखिका मृणालिनी चितळे यांनी लिहिलेली ही कादंबरी आपल्याला गिर्यारोहकांच्या आणि हिमालयाच्या विश्वात घेऊन जाते.
एव्हरेस्ट शिखर सर करणं ही गिर्यारोहकांची तीव्र इच्छा वेगळ्या अर्थाने ती महत्वाकांक्षा असते. हिमालयीन पर्वतरांगा आपल्याला लेखातून कळत असतात पण एखाद्या कादंबरीमध्ये एक पात्र म्हणून त्या येताना प्रथमच दिसतात. चितळे यांनी स्वत: गिर्यारोहणाचा अनुभव घेतलाय, त्याचबरोबर गिर्यारोहण मोहिमांसंबंधींची विविध पुस्तके आणि अन्य बाबींचा तपशीलवार अभ्यास करून या कादंबरीचा सगळा डोलारा उभा केला आहे.
आंतरराष्ट्रीय दर्जाचे गिर्यारोहक जॉर्ज मॅलरी यांनी एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा प्रयत्न केला, मात्र १९२४ मध्ये त्यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यानंतर १९९५ मध्ये त्यांच्या नातवाने एव्हरेस्ट शिखर सर करून आपल्या आजोबांना एकप्रकारे आदरांजली वाहिली. त्यानंतर १९९९ मध्ये मॅलरी यांच्या ७५व्या स्मृतिवर्षात एक शोधमोहीम हाती घेण्यात आली. त्यामध्ये त्यांचा मृतदेह सापडला.
काही वस्तू सापडल्या. या तीन घटना सत्य आहेत. या सत्य घटनांचा आधार घेऊन चितळे यांनी गिर्यारोहण करणाऱ्या एका कुटुंबाची रचना केली. त्याला अन्य गिर्यारोहकाची व त्यातल्या संस्थांची जोड दिली. या गिर्यारोहकामध्ये घडणाऱ्या गोष्टी आणि परस्परांमधील संबंध यातून ही कादंबरी उलगडत जाते.
ही कादंबरी म्हणजे केवळ एखाद्या हिमालयीन ट्रेकचा वृत्तान्त आहे असे नाही तर ट्रेकच्या निमित्ताने एका कुटुंबाच्या तीन पिढ्यांमध्ये काय-काय घडतं, ते कळतं, हे रंगवणं वेगळंच आहे. मुळात हे पुस्तक मॅलरी यांचं चरित्र नाही किंवा एका जागतिक घटनेचा कथानकासाठी केवळ तयार घटनेचा वापर करायचा असा प्रकार नाही.
मॅलरी यांच्या आयुष्यातल्या घटनांचा एखाद्या पार्श्वभूमीसारखा वापर करून संपूर्ण नव्या कथानकात लेखिका आपल्यासमोर येते. ही कथा उलगडत जाते वेगवेगळ्या देशांत, यातली पात्रे आहेत तीन पिढ्यांमधली. पण माणूस कुठेही असला, तरी माणुसकी, भावभावना आणि त्या त्या देशातले प्रश्न हे कितीही वेगळे असले तरी मानवी जीवनावर त्याचा परिणाम होत असतो, तो नेमक्या शब्दांत टिपून चितळे तो परिणाम इथे उत्कटपणे मांडतात.
कुठंही एखादा वृत्तपट किंवा प्रवासवर्णन अथवा एखाद्या मोहिमेचे वर्णन असा प्रकार इथे नाही. पण हिमालय केवळ तोंडी लावायला घेतलाय असेही नाही. माणसांच्या भावभावनांचे जेवढे डोंगर उंच असतात तेवढेच हिमालयीन पर्वतरांगांचे उंच वातावरण इथे कथेत चपखलपणे येते.
कुठली शोधकथा किंवा रहस्यकथा न वाटता माणसांचा पीळ व त्यातून नातेसंबंधांची घट्ट वीण गुंफत ही कादंबरी उलगडत जाते. चितळे यांनी २४ प्रकरणांमध्ये हा सारा कालपट उलगडला आहे. एकाच वेळेला आजोबा-नातू, वडील-मुलगा, दोन तरुणांच्या आयुष्यातील प्रसंग, पतिपत्नीमधील प्रेम, संसारविषयक जबाबदाऱ्या, एखाद्या गोष्टीने माणसं अस्वस्थ का होतात?
आपल्या ध्येयाचा पाठलाग करताना काय-काय अडचणी येतात, त्यावर मात कशी करायची, हे सारं अत्यंत विलक्षण पद्धतीने लेखिकेने आपल्या समोर उलगडले आहे. शेर्पा तेनसिंग आणि एडमंड हिलरी यांनी एव्हरेस्ट शिखर सर केल्यावर त्याच्या बातम्या येणं किंवा त्यांच्या विक्रमाची सतत नोंद होणं हे नवीन नाही, पण या घटनेचा एखाद्या पात्रावर किती परिणाम होतो, हे क्लेअर नावाच्या महिलेच्या माध्यमातून लेखिकेने दाखवून दिले आहे. क्लेअर ही विल्यम रॉबर्टसन यांची कन्या. हेच पात्र जॉर्ज मिलरी यांच्यावरून घेतले आहे.
या पुस्तकातील प्रकरण २ व ३ हे आवर्जून वाचावे असे आहे. एका अर्थाने या पुस्तकाचा आत्मा या प्रकरणातून लक्षात येतो. त्याचबरोबर गिर्यारोहकांचे जीवन आणि हिमालयाचे आकर्षण कसे असते हे स्पष्ट करणारे आहे. विल्यम रॉबर्टसन यांचे सहकारी डॉ. रोलिंग आणि प्रो. ब्रुक हे दोघेही जण रॉबर्टसन यांची मुले डेनिस आणि मुलगी क्लेअर यांना भेटतात.
या भेटीत ते रॉबर्टसन यांच्याबरोबरच्या एव्हरेस्टच्या मोहिमेची माहिती सांगतात. ती मोहीम कशी चित्तथरारक होती, या मोहिमेत विल्यम यांनी मित्रासाठी एव्हरेस्ट सर करायची संधी कशी सोडली तो सारा तपशील कळतो. अर्थात या दोघांनी सांगितलेला तपशील ऐकून डेनिस आणि क्लेअर यांच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या असतात. क्लेअरला तिच्या वडिलांबद्दल प्रचंड प्रेम असते.
त्या प्रेमात उलट भरच पडते. डेनिसला मात्र वडिलांच्या हिमालयीन मोहिमेविषयी थोडीफार नाराजी असते. ती नाराजी कमी होण्याऐवजी वाढतेच. लंडनमधील घर विकण्याच्या निमित्ताने एकत्र आलेले डेनिस आणि क्लेअर यांच्यातील नात्यांचा गुंता कळतोच कळतो; पण कथानायक विलीच्या मनात आजोबांविषयी जे कुतूहल जागृत होते आणि एव्हरेस्ट मोहिमेचे बीजारोपण कसे होते तेही कळते.
या कादंबरीत हिमालयीन जग आणि गिर्यारोहकांचे विश्व उलगडले गेले आहे. आतापर्यंत पोस्ट खाते, जहाजावरचे जग तसेच सैन्यदलातले आयुष्य त्याचबरोबर उपेक्षितांच्या आयुष्यातले अडचणींचे प्रसंग आणि त्यांचे जग साहित्यातून पुढे आले आहे. पण गिर्यारोहक आणि हिमालयीन ट्रेक इतक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे सारे कथानकच त्याभोवती गुंफलेले असे झालेले नाही.
ग्रेसी, तिचे पती विल्यम रॉबर्टसन, त्यांची मुले टेनिस आणि क्लेअर, डेनिसचा मुलगा विली आणि त्याची बायको केझिया, विलीचे जवळचे सहकारी यांच्या दिनक्रमातून हिमालयीन जग उलगडत जाते. बर्फाळ जगातल्या मानसिक आंदोलनाची ही कथा मात्र सळसळती आणि मनावरचा तोच तोचपणाचा बर्फ विरघळवून टाकते.
कादंबरीत जशी आजोबांच्या कर्तृत्वाची गाथा आहे तसेच त्यांचे एव्हरेस्टचे स्वप्न पूर्ण करणारा नातूदेखील आहे. त्याला एव्हरेस्ट मोहिमेचा लागलेला ध्यास त्याच वेळी त्याची पत्नी केझिया यांच्याबरोबरचे त्याचे प्रेम या दोघांमधील प्रेमाचा प्रवास आपल्यासमोर येतो. एका पत्रातून कथानायक विलीला साथ देणारा अशोक याचे जीवन उलगडते.
बापलेकाचे संबंध किती गुंतागुंतीचे असू शकतात याचा प्रत्यय देणारे प्रसंग यात आहेत. अशोकचं पत्र याबाबतीत पुरेसे बोलके आहे. कथानायक विली याची आत्या क्लेअर ही या कादंबरीत महत्त्वाची भूमिका बजावते. हिमालयातल्या गिर्यारोहणामधल्या विक्रमवीराच्या घरातील ही कन्या जगातील किती गोष्टींशी संबंधित आहे आणि नकळतपणे तिच्यावर किती गोष्टींचा ताण आहे हे तिच्या व्यक्तिरेखेतून कळते.
मराठी साहित्यात आतापर्यंत काही नामवंतांनी वेगळ्या जगाचा वेध घेतला; पण गिर्यारोहण हा विषय ज्या पद्धतीने या कादंबरीत समोर येतो त्यात वाचक हरवून जातोच. गिर्यारोहणातील क्लिष्टता किंवा त्यातील तांत्रिक बाबींचा भडिमार येथे नसल्याने कथानायक विली आणि त्याच्या सभोवतालची पात्रे यामध्ये वाचकांचे मन गुंतते आणि दोघांचे भावविश्व एक होते, हेच लेखिकेचे यश आहे. गिर्यारोहक सातत्याने हिमालयात कसे जातात, त्यांना हिमालय कसा खुणावत असतो, त्याचाही शोध यातल्या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून लेखिकेने घेतलाय.
पुस्तकाचे नाव : ज्याचं त्याचं एव्हरेस्ट
लेखिका : मृणालिनी चितळे
प्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे (०२०-२४४७३४५९)
वितरक : रसिक साहित्य प्रा. लि.
पृष्ठे : २०८
मूल्य : ३५० रुपये.