Sangli : तान्हुल्याचा चेहरा पाहून तिच्या डोळ्यांत पाणी दाटलं! रुग्णालयातून तीन दिवसांपूर्वी पळवून नेलेलं 'ते' बाळ अखेर सापडलं
esakal May 06, 2025 02:45 PM

सांगली : मिरजेतील शासकीय रुग्णालयातून (Miraj Government Hospital) तीन दिवसांपूर्वी पळवून नेलेले बाळ काल रात्री सापडले. चोरट्या महिलेला (Sangli Police) गजाआड करत सावळज येथे कारवाई केली. महात्मा गांधी चौकी पोलिसांना यश आले असून, बाळ सुखरूप आहे. सारा सायबा साठे (वय २४, रा. डोंगरसोनी रस्ता, अल्ताफ गॅरेज पाठीमागे, सावळज, मूळ रा. इचलकरंजी) असे त्या महिलेचे नाव आहे. दरम्यान, अपर अधीक्षक रितू खोखर यांनी ते बाळ स्वतः मातेकडे सुपूर्द केले.

तान्हुल्याचा चेहरा पाहून तिच्या डोळ्यांत पाणी दाटले. तिला हुंदकाही फुटेना. डोळे भरून पाहिले अन् ती भेदरून गेली. अधिक माहिती अशी, कोळे (ता. सांगोला, जि. सोलापूर) येथील कविता समाधान आलदर ही महिला प्रसूतीसाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल झाली होती. सहा दिवसांपूर्वी त्यांना मुलगा झाला. आलदर यांना प्रसूतीनंतर उपचारासाठी रुग्णालयातील वॉर्डात ठेवले होते. तीन दिवसांपूर्वी संशयित साठे या महिलेने बाळाला डोस द्यायच्या बहाण्याने पळवून नेले.

रुग्णालयातील सुरक्षा यंत्रणा भेदून महिला बाळाला घेऊन पळून गेल्याने खळबळ उडाली. याची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी शोध सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजद्वारे निपाणीतील एका महिलेवर संशय आला. पण, पथकाच्या पदरी निराशाच आली. दरम्यान, महात्मा गांधी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक संदीप शिंदे, सुनील गिड्डे यांनी तपासाला उलटी दिशा दिली. त्यातून सावळज येथे ती महिला असल्याची पक्की माहिती रात्री समोर आली. तातडीने पथक त्या महिलेच्या घरी दाखल झाले. तिच्याजवळ बाळ सुखरूप असल्याची खात्री केली.

त्यानंतर त्या महिलेस आणि बाळास मिरजेतील शासकीय रुग्णालयात आणले. अपर पोलिस अधीक्षक रितू खोखर यांनी ते बाळ त्या माऊलीच्या ताब्यात दिले. त्यानंतर माऊली ढसाढसा रडू लगली. दरम्यान, यापूर्वीच पोलिसांनी वैद्यकीय पथकामार्फत बाळाची तपासणी केली ते बाळ सुखरूप असल्याचे समोर आले. कारवाईत अपर अधीक्षक रितू खोखर, एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे, महात्मा गांधी पोलिस चौकीचे सहायक निरीक्षक संदीप शिंदे, सुनील गिड्डे, उपनिरीक्षक रूपाली गायकवाड, संदीप गुरव, धनंजय चव्हाण, अभिजित धनगर, अभिजित पाटील, मोहसीन टिनमेकर, राजेंद्र हारगे, रणजित घोडके, सायबरच्या रूपाली बोबडे, अफरोज पठाण, सतीश आलदर, कॅप्टन गुंडवाडे पथकाचा समावेश होता.

  • - वेळ : साडेनऊ वाजता - बाई पोलिसांच्या ताब्यात

  • - वेळ : पावणेदहा वाजता - अपर पोलिस अधीक्षक रितू खोखर बाळा घेऊन रुग्णालयात दाखल

  • - वेळ : पावणेदहा वाजता - मिरजकरांकडून पोलिसांचे टाळ्या वाजवून कौतुक

  • - वेळ : रात्री दहापन्नास वाजता - अतिदक्षता विभागात तपासणी

  • - वेळ : रात्री अकरा - अपर अधीक्षकांनी मुलास आईच्या ताब्यात दिले

आमच्या लेकराला कसं आणलं

बाळाची आजी लक्ष्मी यांनी रितू खोखर यांच्या गालावरून हात ठेवत माझ्या लेकराला कसं आणलं, असे विचारत कौतुक केले. खोखर या भारावून गेल्या. आजोबांनी तर पोलिसांचे पाय धरले.

सीसीटीव्हीची मदत

महापालिका क्षेत्रातील साठ टक्के सीसीटीव्ही बंद आहे; परंतु मिरज शासकीय रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सीसीटीव्हीही बंद अवस्थेत होता. काही दिवसांपूर्वी तो निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी दुरुस्त करून तो कार्यान्वित केला होता. एलसीबीचे पथक मोकळ्या हाताने परत आल्यानंतर पुन्हा पोलिसांनी पाटी कोरी केली. नव्याने तपासाची चक्रे फिरविली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पुन्हा तपासण्यात आले. सहायक निरीक्षक सुनील गिड्डे यांना ती महिला तासगाव एसटीतून उतरल्याचा एक धागा मिळाला. तेथून ही कड्या जुळवत पोलिस सावळजपर्यंत पोहोचले.

यासाठी ‘त्या’ महिलेचे कृत्य

संशयित सारा ही महिला सावळज येथे भाड्याने राहते. तिचा पती पेंटिंगची कामे करतो. ती मूळची इचलकरंजी येथील आहे. या महिलेला तीन मुली आहेत. तिला मुलाचा हव्यास होता. त्यातच तिचा गर्भपात झाल्याचे सांगितले. त्यामुळे मुलाचे अपहरण करून हा माझाच मुलगा आहे, असे भासवण्याचा तिने प्रयत्न केला, असे अपर अधीक्षक रितू खोखर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.