अस्थमा : वाढती आरोग्य समस्या आणि दुर्लक्षित उपाययोजना
esakal May 06, 2025 02:45 PM

अस्थमा ही भारतात वेगाने वाढणारी एक गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्या ठरली आहे. सध्या देशात अंदाजे ३.४३ कोटी लोक अस्थमाने ग्रस्त आहेत. जागतिक अस्थमा रुग्णसंख्येच्या सुमारे १३ टक्के रुग्ण भारतातच आहेत. ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. मुलांमध्ये अस्थमाचे वाढते प्रमाण दिसून येते. सुमारे ७.९ टक्के मुले अस्थमाने प्रभावित असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर, पंधरा वर्षांवरील सुमारे २.४ टक्के प्रौढही या आजाराने ग्रस्त आहेत.

डॉ. स्वप्नील बरावकर, एमबीबीएस, एमडी (पल्मोनरी मेडिसिन)

विशेष लक्ष देण्यासारखी बाब म्हणजे, जगभरातील एकूण अस्थमा मृत्यूंपैकी ४६ टक्के मृत्यू भारतात होतात. २०१९ मध्ये ही संख्या ४३ टक्के होती. यात झालेली वाढ हा भारतासाठी धोक्याचा मोठा इशारा आहे. धक्कादायक म्हणजे, देशातील ८० टक्क्यांहून अधिक अस्थमा रुग्णांचे निदानच झालेले नाही. आणि ९० टक्क्यांहून अधिक रुग्ण अशा आजाराच्या प्रभावी उपचारासाठी आवश्यक असलेले इनहेलर वापरतच नाहीत.

भारतामध्ये अस्थमा वाढण्यामागे अनेक घटक कारणीभूत आहेत. त्यात सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे पर्यावरणीय प्रदूषण. भारतातील अनेक शहरे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत समाविष्ट आहेत. त्याशिवाय, सामाजिक व आर्थिक विषमता यामुळे आरोग्यसेवा आणि अस्थमा संदर्भातील जनजागृतीमध्ये मोठी दरी आहे. परिणामी, रुग्णांचे निदान उशिरा होते आणि उपचारांमध्ये सातत्य राहात नाही. विशेषतः ग्रामीण व वंचित भागांमध्ये ही समस्या अधिक तीव्र आहे.

अस्थमाचे ट्रिगर ऋतूनुसार बदलू शकतात. वसंत ऋतूमध्ये झाडांचे परागकण, उन्हाळ्यात गवताचे तर हिवाळ्यात तणांचे परागकण अस्थमा वाढवतात. त्याचप्रमाणे, थंड हवा, आर्द्रता, हवामानातील अचानक बदल, प्रदूषण आणि श्वसन संसर्ग देखील अस्थमाचे मुख्य कारण ठरू शकतात. घरामध्ये असलेले डस्ट माइट्स, प्राण्यांचे केस, बुरशी, ओलावा, झुरळांचे अंश, सुगंधी द्रव्ये, अगरबत्ती किंवा डास मारक कॉईलचा धूर देखील लक्षणे बळावू शकतात.

अस्थमाचे ट्रिगर शारीरिक कारणांपुरते मर्यादित नसतात. मानसिक ताणतणाव आणि चिंता देखील अस्थमाला वाढवणारे घटक ठरू शकतात. तीव्र भावना ब्रॉन्कोस्पॅझम घडवून आणू शकतात, तर दीर्घकालीन तणावामुळे औषधांचा परिणाम कमी होतो. अशा अवस्थेला "Stress-Induced Asthma" असे म्हणतात.

अस्थमा, ब्राँकायटिस आणि अॅलर्जी यामध्ये नेहमीच गोंधळ होतो, पण हे तिन्ही एकसारखे नसतात. अस्थमा ही दीर्घकालीन जळजळजन्य स्थिती असते, तर ब्राँकायटिस बहुतांश वेळा संसर्गामुळे होतो. अॅलर्जी ही शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीची प्रतिक्रिया असते. त्यामुळे अचूक निदान झाले तरच उपचार प्रभावी ठरतात.

आजही अस्थमाच्या उपचारांबाबत अनेक गैरसमज आहेत, विशेषतः इनहेलरविषयी. काही लोकांना वाटते की इनहेलरचा वापर व्यसन निर्माण करतो, पण हे चुकीचे आहे. वास्तव हे आहे की, रोज वापरण्यात येणारे कंट्रोलर इनहेलर सूज कमी करतात आणि दीर्घकालीन नियंत्रण मिळवून देतात. रिलिव्हर इनहेलर हे तात्काळ आराम देतात. मात्र, जर त्याचा वारंवार वापर करावा लागत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते.

अस्थमावर नियंत्रण मिळवण्यासाठी फक्त औषधेच नव्हे, तर जीवनशैलीमध्ये बदल करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. नियमित व्यायाम जसे की चालणे, सायकलिंग, पोहणे, योगा, प्राणायाम यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता सुधारते. व्यायामाआधी डॉक्टरांच्या सल्ल्याने रेस्क्यू इनहेलर वापरणे फायदेशीर ठरते.

संतुलित आणि पोषणयुक्त आहार देखील अस्थमा व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावतो. अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इन्फ्लेमेटरी घटक असलेले पदार्थ जसे की सफरचंद, संत्री, पालक, गाजर, अळशी, अक्रोड, सॅल्मन मासा, हळद, आलं, लसूण यांचा आहारात नियमित समावेश केल्यास फायदे होतात. दुसरीकडे, प्रोसेस्ड फूड, कोल्ड ड्रिंक्स आणि मसालेदार पदार्थ टाळावेत.

आपात्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी रुग्णांनी स्वतःकडे एक अस्थमाकिट ठेवणे गरजेचे आहे. या किटमध्ये त्वरित आराम देणारा इनहेलर, स्पेसर, डॉक्टरांनी तयार केलेला अॅक्शन प्लॅन, पीक फ्लो मीटर, आपत्कालीन संपर्क क्रमांक तसेच गरज भासल्यास अँटी-हिस्टॅमिन्स व स्टेरॉईड गोळ्या असाव्यात. किट थंड आणि कोरड्या ठिकाणी ठेवावे, आणि विशेषतः मुलांच्या बाबतीत पोर्टेबल स्वरूपात सोबत नेणे आवश्यक आहे.

भारतासमोरील अस्थमा समस्या सोडवण्यासाठी अनेक स्तरांवर काम करणे आवश्यक आहे. यासाठी जनजागृती वाढवणे, प्राथमिक आरोग्यसेवा बळकट करणे आणि प्रदूषण कमी करण्यासाठी धोरणात्मक पावले उचलणे, हे तिन्ही पैलू समान पातळीवर महत्त्वाचे आहेत. ही पावले न उचलल्यास, अस्थमा ही समस्या भविष्यात अधिक बिकट रूप घेईल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.