जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 15 दिवसांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांनी प्राण गमावले. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाचे वातावरण असून भारत-पाकिस्तानदरम्यानही तणावाचे वातावरण आहे. त्याच पार्श्वभूमीवर उद्या देशभरातील विविध राज्यात मॉक ड्रील घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. शाळा, मॉल, रेल्वे स्थानके, बस स्टँड आणि इतर गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी मॉक ड्रील म्हणजेच सराव कवायती आयोजित करण्याच्या सूचना गृह मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना जारी केल्या आहेत. भारत-पाकिस्तानच्या युद्धाचे ढग घोंगावू लागल्याच्या पार्श्वभूमीवरच हा निर्णय घेण्यात आला असून सर्वत्र अलर्टच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
याचदरम्यान निवृत्त लेफ्टनंट जनरलनी यांनी एक महत्वाचा वक्तव्य केलं आहे. पाकिस्तानसोबत 100 टक्के युद्ध होणार, पाकविरुद्धच्या प्रत्येक युद्धात भाग घेतलेल्या निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेखटकर यांनी हा दावा केला आहे. टीव्ही9 मराठीच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधला.
महाराष्ट्रात सर्वाधिक धोका
मी पाकिस्तान मध्ये झालेल्या प्रत्येक युद्धात भाग घेतलेला आहे. 1965 च्या युद्धात आम्ही लाहोर पर्यंत पोहोचलो होतो. कारगिल युद्धात चीनच्या सीमेवर मी नियंत्रण करत होतो, असं त्यांनी नमूद केलं. पूर्ण भारतात उद्या मॉक ड्रिल होईल. युद्धाची परिस्थिती उद्भवलीच तर शत्रू कुठे हल्ला करेल हे सांगता येत नाही, याकरिताच मॉक ड्रिल महत्त्वाचे असते. सुरक्षेच्या दृष्टीने महाराष्ट्र महत्त्वाचा आहे, मुंबईत अणुबॉम्ब केंद्र आहे, व्यापारी केंद्र आहे, विमानतळ आहे हे अत्यंत महत्त्वपूर्ण असतं. त्यामुळे पूर्ण देशात महाराष्ट्रात सर्वात धोका आहे गुजरात मधील देखील तेवढाच धोका आहे, असे त्यांनी स्पष्ट केलं.
पाकिस्तान बरोबर युद्ध शंभर टक्के होणार
युद्धाला तोंड फुटलं तर शत्रू कुठे हल्ला करेल हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. मॉक ड्रिलच्या वेळेस इलेक्ट्रिसिटी, सर्व लाईट बंद होतील. लाईट पूर्णपणे बंद ठेवावे लागतील. महत्वाची गोष्ट म्हणजे सगळी फाईव्ह स्टार हॉटेल्स जी आहेत, ती विमानतळाच्या आसपासच असतात, त्यामुळे तिथेही काळजी घेतली पाहिजे, असा सल्ला शेखटकर यांनी दिला. सगळ्या लोकांनी मॉक ड्रिलचं पालन इमानदारीने केलं पाहिजे. पाकिस्तान बरोबर युद्ध शंभर टक्के होणार, असा दावा करत आपल्याला अचानक होणाऱ्या हल्ल्यासाठी तयार राहिलं पाहिजे, असेही त्यांनी नमूद केलं.
आपल्यावर कुठेही हल्ला होऊ शकतो
निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेखटकर पुढे असेही म्हणाले की,” पाकिस्तानकडे सातशे किलोमीटर ते हजार किलोमीटर रेंजपर्यंतचे मिसाईल आहेत. त्यामुळे शत्रू आपल्यावर कुठेही हल्ला करू शकतो हे आपण गृहीत धरलं पाहिजे. तसेच जिथे जिथे फॅक्टरी,विमानतळ आहेत, त्या ठिकाणी जास्त काळजी घेतली पाहिजे ” असे ते म्हणाले. लोकांची जबाबदारी काय? लोकांनी काय केलं पाहिजे? लोकांचं कर्तव्य काय? यासाठी मॉक ड्रिल असल्याचंही शेखटकर यांनी स्पष्ट केलं.