दोडामार्ग : साटेली-भेडशी येथील ‘त्या’ अनधिकृत बांधकाम केलेल्या इमारतीवर आज सकाळी प्रशासनाच्या परवानगीने बुलडोझर फिरविण्यात आला. हिंदू संघटनांच्या (Hindu Organizations) कार्यकर्त्यांनी केलेल्या मागणीनुसार प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलला. पोलिस (Dodamarg Police) बंदोबस्तात ही इमारत जमीनदोस्त करण्यात आली.
साटेली-भेडशी येथील अनधिकृत बांधकाम केलेल्या इमारतीत संशयास्पद हालचाली दिसू लागल्याने स्थानिक व पोलिसांना सोबत घेऊन त्या इमारतीवर छापा मारला. यावेळी अवैधरीत्या बाळगलेल्या दोन तलवारी पोलिसांनी जप्त केल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी दोंघांवर कारवाई केली होती. या खळबळ जनक घटनेनंतर जागृत हिंदू संघटना व स्थानिक एकत्र येऊन त्या दोघांवर कारवाई करण्याची मागणी लाऊन धरली होती.
त्यानुसार पोलिसांनी त्या इमारतीत राहणाऱ्या अस्लम इस्माईल शेख व बिलाल आलम शेख या दोघांवर गुन्हा दाखल केला होता. अशा घटनांना थारा देणाऱ्या या इमारतीत भविष्यात वेगळा प्रकार उद्भवू नये, तसेच धार्मिक तेढ निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला जात आहे तो थांबला पाहिजे, त्यामुळे ही अनधिकृत इमारत जमीनदोस्त करण्याची आग्रही मागणी हिंदू संघटनांनी व स्थानिकांनी केली होती.
दोडामार्गच्या प्रभारी तहसीलदार प्रज्ञा राजमाने, पोलिस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा करत तहसीलदार राजमाने यांनी इमारत बांधकाम परवानगीबाबत माहिती घेऊन योग्य कार्यवाही करण्याची ग्वाही दिली होती. हिंदुत्ववादी संघटनेने व ग्रामस्थांनी केलेल्या मागणीचे गांभीर्य लक्षात घेत प्रशासनाने त्या दिशेने कार्यवाही सुरू केली. प्रभारी तहसीलदार प्रज्ञा राजमाने व गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत यांच्याकडे सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे साटेली-भेडशी ग्रामपंचायतीने या इमारतीचे पाण्याचे कनेक्शन तात्काळ बंद करावे.
तसेच महाराष्ट्र विद्युत वितरणने या इमारतीतील वीज कनेक्शन बंद करावे, पोलिसांनी या इमारतीचा ताबा घ्यावा, कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी योग्य उपाययोजना करावी. तसेच आवश्यक पोलिस बंदोबस्त ठेवावा, असे आदेश दिले होते. त्यानुसार कार्यवाही करण्यात आली. कडक पोलिस बंदोबस्तात आज सकाळी या इमारतीवर बुलडोझर चालवण्यात आला. यात हिदू संघटनाचे कार्यकर्ते अग्रकमाने पुढे होते.
स्थानिकांनी मानले पालकमंत्र्यांचे आभारस्थानिक ग्रामस्थांना जीवितास धोका निर्माण करणारी ती अनधिकृत इमारत आज पहाटेच्या वेळी पालकमंत्री नितेश राणे यांच्या सहकार्याने व स्थानिक हिंदुत्ववादी संघटना यांच्या सहकार्यातून ही अनधिकृत इमारत पाडण्यात आल्याचे सांगत स्थानिक ग्रामस्थ, स्थानिक मुस्लिम बांधव यांनी पालकमंत्री नीतेश राणे व हिंदुत्ववादी संघटनेचे आभार मानले.