इंडियन आयडॉल फेम सिंगर आयपीएलमध्ये अम्पायर, 17 वर्षात असा झाला बदल
GH News May 07, 2025 01:07 AM

आयपीएल 2025 स्पर्धेत प्लेऑफची शर्यत चुरशीची होताना दिसत आहे. आयपीएल स्पर्धेत 55 सामने पार पडले असून येत्या काही दिवसात प्लेऑफचे चार संघही ठरतील. 25 मे रोजी अंतिम फेरीचा सामना आहे. तत्पूर्वी एका पंचांची जोरदार चर्चा रंगली आहे. अनेक जण डोक्याला ताण देऊन त्या पंचाला कुठे पाहीलं आहे का? याचा विचार करत आहेत. मग एकदम आठवलं की आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहात नाही. आयपीएलसाठी पहिल्यांदाच निवड झालेल्या सात पंचांमध्ये एकाची पंचाची ख्याती आधीच सर्वदूर पसरली आहे. या पंचाने यापूर्वी गायनक्षेत्रात नावलौकीक मिळवला आहे. इंडियन आयडॉलसारख्या मोठ्या टीव्ही रिएलिटी शोमध्ये आपल्या गायिकीची छाप सोडली आहे. आयपीएल स्पर्धा 2008 साली सुरु झाली तेव्हा हा पंच गायनक्षेत्रात आपली ओळख निर्माण करत होता. आता 17 वर्षानंतर ही व्यक्ती आयपीएलचा भाग आहे. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून पराशर जोशी आहेत. पाराशर जोशी हे पुण्याचे रहिवासी आहेत.

पाराशर जोशी यांचा गायक ते पंच हा प्रवास खूपच रंजक राहिला आहे. पाराशर जोशी इंडियन आयडॉल 2008 मध्ये स्पर्धक होते. चौथ्या पर्वात त्याने पियानो राउंडपर्यंत मजल मारली होती. मात्र त्यानंतर या शोमधून बाहेर पडला. याआधी पाराशर जोशीला सतत नकारघंटा ऐकायला मिळाली होती. पण पाराशर जोशीला गायनासोबत क्रिकेट खेळण्यातही रस होता. त्याने क्लब लेवलपर्यंत क्रिकेट खेळलं आहे. पण त्यानंतर पंचगिरीत नशिब आजमवण्याचा निर्णय घेतला.

पाराशर जोशीने रणजी आणि दुलीप ट्रॉफी स्पर्धेत पंचाची भूमिका बजावली आहे. आयपीएल स्पर्धेत पंचगिरी करण्यापूर्वी 2024 मध्ये वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत पंच म्हणून दिसले होते. पाराशरला 2015 मध्ये बीसीसीआयने पंचांच्या पॅनेलमध्ये सहभागी केलं होतं. पाराशर आतापर्यंत 9 फर्स्ट क्लास, 24 लिस्ट ए आणि 30 टी20 सामन्यात पंचांनी भूमिकेत दिसला. याशिवाय 1 फर्स्ट क्लास, 1 लिस्ट ए आणि 3 टी20 सामन्यात पंचांची भूमिका बजावली आहे. 5 एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यातून पराशर जोशी यांचे आयपीएलमध्ये पंच म्हणून पदार्पण झाले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.