अमेरिकेचे माजी अध्यक्ष जो बायडन यांना प्रोस्टेट कॅन्सर; काय आहे हा आजार, याची लक्षणं कोणती?
BBC Marathi May 19, 2025 04:45 PM
Getty Images

अमेरिकेचे माजी अध्यक्ष जो बायडन (वय 82) यांना प्रोस्टेट कॅन्सरचे निदान झाले आहे. हा कॅन्सर त्यांच्या हाडांमध्ये पसरलेला असल्याचं त्यांच्या कार्यालयाने रविवारी (18 मे) प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात सांगितले.

जानेवारी महिन्यात बायडन यांनी पदाचा राजीनामा दिला (ट्रम्प यांच्याकडून निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर) होता.

गेल्या आठवड्यात मूत्रविसर्जनासंबंधी काही लक्षणांमुळे डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्यांना कर्करोगाचे निदान झाले.

हा कर्करोग झपाट्याने पसरणारा असून त्याचा ग्लिसन स्कोअर 10 पैकी 9 आहे. याचाच अर्थ त्यांचा आजार 'हाय ग्रेड' प्रकारात मोडतो आणि या कर्करोगाच्या पेशी जलद गतीने पसरू शकतात, असे कॅन्सर रिसर्च UK नुसार सांगितले जाते.

सध्या उपचाराचे विविध पर्याय विचाराधीन असल्याचं बायडन आणि त्यांच्या कुटुंबाने म्हटलं आहे. हा कॅन्सर हार्मोन-संवेदनशील असल्याने त्यावर उपचार होऊ शकतात असं माजी राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाने म्हटलं आहे.

बायडन यांना कॅन्सरचे निदान झाल्यानंतर अमेरिकेतील दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला आहे.

अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल या त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलं आहे की, ते आणि फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प हे जो बायडन यांच्या आजाराच्या निदानाबद्दल ऐकून दुःखी आहेत.

"आम्ही जिल (जो बायडन यांच्या पत्नी) आणि त्यांच्या कुटुंबासाठी मनापासून सदिच्छा व्यक्त करतो," असे त्यांनी म्हटले. "मी बायडन यांना लवकर आणि पूर्णं बरे होण्यासाठी शुभेच्छा देतो."

जो बायडन यांच्या कार्यकाळात उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या कमला हॅरिस यांनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलं आहे की, त्या आणि त्यांचे पती डग एमहॉफ बायडन कुटुंबासाठी प्रार्थना करत आहेत.

त्यांनी पुढे म्हटलं, "जो हे लढवय्ये आहेत. ज्या ताकद, चिकाटी आणि आशावादाने त्यांनी त्यांचे आय़ुष्य आणि नेतृत्व घडवले त्याच गुणांनी ते ही लढाई लढतील."

2009 ते 2017 या काळात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या बराक ओबामा यांनीही त्यांच्या 'एक्स' वर जो बायडन यांच्यासाठी पोस्ट लिहिली आहे. जो बायडन हे ओबामा यांच्या काळात अमेरिकेचे उपाध्यक्ष होते.

ओबामा यांनी लिहिलं आहे की, ते आणि त्यांची पत्नी मिशेल बायडन कुटुंबाचाचा विचार करत आहेत.

"कॅन्सरविरुद्ध लढा देण्यासाठी कुणीही जोपेक्षा अधिक प्रयत्न केलेले नाहीत आणि मला खात्री आहे की जो ही लढाई आपल्या नेहमीच्या दृढनिश्चय आणि नम्रतेने लढेल. त्यांनी लवकरात लवकर आणि संपूर्ण बरं होण्यासाठी आम्ही प्रार्थना करतो," असं ओबामा यांनी म्हटलं आहे.

ओबामा यांनी 2016 साली 'कॅन्सर मूनशॉट' प्रकल्प सुरू केला होता आणि बायडन यांना त्याचे नेतृत्व करण्यासाठी नियुक्त केले होते.

Getty Images

गेल्या वर्षी जो बायडन यांनी आरोग्य आणि वय यांविषयीच्या चिंतेमुळे 2024 मध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली होती.

ते अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात वृद्ध राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत.

दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरलेले जो बायडन हे जून 2024 साली रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात झालेल्या एका चर्चासत्रात खराब कामगिरी केल्याबद्दल मोठ्या प्रमाणात टीकेचे लक्ष्य बनले होते. त्यानंतर कमला हॅरिस यांना डेमोक्रॅटिक पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली.

क्लीव्हलँड क्लिनिकनुसार, प्रोस्टेट कर्करोग हा पुरुषांमध्ये त्वचेमधील कॅन्सनंतर दुसऱ्या क्रमांकाचा कॅन्सर आहे. यूएस सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रिवेन्शन (CDC) नुसार 100 पैकी 13 पुरुषांना कधीतरी प्रोस्टेट कॅन्सर होईल.

CDC ने म्हटल्यानुसार वय हे कॅन्सर होण्यामागील सर्वांत जोखमीचं कारण आहे.

डॉ. विल्यम डाहट हे अमेरिकन कॅन्सर सोसायटीचे चीफ सायंटिफिक ऑफिसर आणि प्रोस्टेट कॅन्सर तज्ज्ञ आहेत. त्यांनी BBC ला सांगितले की, बायडन यांचा कॅन्सर झपाट्याने पसरणारा असल्याचं उपलब्ध माहितीनुसार दिसून येतंय.

"सामान्यतः, जर कॅन्सर हाडांपर्यंत पसरलेला असेल, तर आपण त्याला बरे होणारा कॅन्सर मानत नाही," असे डॉ. डाहट यांनी सांगितले.

तथापि, त्यांनी असेही सांगितले की बहुतांश रुग्ण सुरुवातीच्या उपचारांना चांगला प्रतिसाद देतात आणि या कॅन्सरच्या निदानानंतरही लोक अनेक वर्षे जगू शकतात."

BBC

डॉ. डाहट म्हणाले की, माजी राष्ट्राध्यक्षांना ज्या कॅन्सरचे निदान झाले आहे, त्यामध्ये रुग्णाला बहुतांश हार्मोनल थेरपी दिली जाते जेणेकरून या आजाराची लक्षणं कमी होतील आणि कॅन्सरच्या पेशींच्या वाढीला आळा बसेल.

व्हाईट हाऊस सोडल्यानंतर बायडन यांची सार्वजनिक जीवनात फारशी उपस्थिती दिसत नव्हती.

एप्रिलमध्ये, त्यांनी अमेरिकेतील अपंग व्यक्तींसाठी काम करणाऱ्या 'अॅडव्होकेट्स, काउंसिलर्स अँड रिप्रेझेंटेटिव्ह्ज फॉर द डिसेबल्ड' या संस्थेच्या एका परिषदेत भाषण केले होते.

मे महिन्यात, त्यांनी BBC ला एक मुलाखत दिली होती. व्हाईट हाऊस सोडल्यानंतरची ही त्यांची पहिली मुलाखत होती. या मुलाखतीत त्यांनी 2024 च्या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय 'कठीण' असल्याचे मान्य केले.

गेल्या काही महिन्यांत बायडन यांच्या आरोग्याविषयी प्रश्न उपस्थित केले जात होते.

अनेक वर्षांपासून, बायडन यांनी कॅन्सरवरील संशोधनासाठी सक्रिय पाठिंबा दिला आहे.

2022 मध्ये त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने 'कॅन्सर मूनशॉट' उपक्रम पुन्हा सुरू केला. याचा उद्देश हा 2047 पर्यंत कॅन्सरने होणारे चाळीस लाखांहून अधिक मृत्यू रोखण्यासाठी संशोधनाला गती देणे हा आहे.

बायडन यांचा मोठा मुलगा ब्यू याचा 2015 मध्ये मेंदूच्या कर्करोगामुळे मृत्यू झाला होता.

प्रोस्टेट कॅन्सर म्हणजे काय?

प्रोस्टेट ही एक पुरुषांच्या जननेंद्रियाजवळ असणारी लहानशी ग्रंथी असते.

एखाद्या अक्रोडाच्या आकाराएवढी ही ग्रंथी असते. ती शिश्न आणि मूत्राशय यांच्या मधल्या भागात असते. तसेच ती मूत्रमार्गाजवळ असते.

एक प्रकारचा पांढरा प्रवाही पदार्थ तयार करणे हे या ग्रंथीचं मुख्य काम असतं. हा स्राव आणि वृषणं (टेस्टिकल्स)मधून तयार झालेले शुक्रजंतू (स्पर्म) एकत्र होऊन वीर्य (सिमेन) तयार होतं.

जेव्हा प्रोस्टेट ग्रंथीमधील पेशी अनियंत्रितरित्या वाढतात तेव्हा हा कॅन्सर तयार होतो.

काही रुग्णांमध्ये या कॅन्सरची वाढ अत्यंत मद असते. परंतु काही रुग्णांमध्ये हा कॅन्सर वेगाने वाढतो आणि पसरण्याची शक्यता असते. यामुळे रुग्णाचा त्रास वाढू शकतो आणि त्याचा प्रसार रोखण्यासाठी उपचारांची गरज असते.

Getty Images प्रोस्टेट कॅन्सरची लक्षणं

प्रोस्टेट कॅन्सरची लक्षणं सहसा मूत्राशय (ब्लॅडर) आणि पेनिस (शिश्न) यांना जोडणाऱ्या नलिकेवर परिणाम होईल इतकी ही ग्रंथी मोठी झाल्याशिवाय दिसत नाहीत.

असा परिणाम झाल्यावर तुम्हाला काही गोष्टी दिसून येतील-

  • सतत लघवीला जावं लागणं
  • लघवीच्यावेळेस ताण येणं.
  • लघवी पूर्ण झाली आहे असं न वाटणं.

या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. ही लक्षणं आहेत याचा अर्थ तुम्हाला प्रोस्टेट कॅन्सर आहे असा होत नाही. परंतु अशा लक्षणांनंतर डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे. अशी लक्षणं प्रोस्टेट एन्लार्जमेंटचीही असू शकतात.

प्रोस्टेट कॅन्सरची कारणं

एनएचएस आरोग्यसेवेने प्रोस्टेट कॅन्सरच्या कारणांबद्दल माहिती दिली आहे. याची कारणं बहुतांश अज्ञात आहेत असं ही सेवा सांगते. परंतु काही गोष्टींमुळे हा कॅन्सर होण्याची शक्यता वाढते.

वयपरत्वे हा कर्करोग होण्याची शक्यता वाढते.

पुरुषांनी पन्नाशी ओलांडल्यावर तसंच वृद्धत्वामध्ये हा कर्करोग होण्याची शक्यता असते.

ज्या पुरुषांचे भाऊ, वडील यांना हा कर्करोग झाला आहे अशांना याचा त्रास होण्याची शक्यता थोडी जास्त असते.

नव्या संशोधनानुसार लठ्ठपणामुळेही या कर्करोगाची भीती वाढते.

या कॅन्सरशी संबंधित काही घटकांसंदर्भात 'प्रोस्टेट कॅन्सर युके' संस्थेने माहिती दिली आहे.

त्यांच्या माहितीप्रमाणे पन्नाशी उलटलेल्या आणि वृद्धत्वाकडे झुकणाऱ्या पुरुषांना याचा धोका जास्त असतो. 65 ते 69 या वयोगटामध्ये हा कॅन्सर सापडण्याची शक्यता जास्त असते.

Getty Images

भारतामध्ये प्रोस्टेट कॅन्सरचं प्रमाण 65 वर्षांवरील पुरुषांमध्ये जास्त दिसून आल्याचं इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचा अहवाल सांगतो.

याबरोबरच या संस्थेने कौटुंबिक इतिहास आणि अनुवंशिकतेकडेही बोट दाखवले आहे.

प्रोस्टेट कॅन्सर युके सांगते, तुमचा कौटुंबिक इतिहास ही तुमच्या कुटुंबावर परिणाम करणाऱ्या सर्व आरोग्यविषयक समस्यांची माहिती असते. कुटुंबात जनुकं, पर्यावरण, जगण्याची पद्धत अशा अनेक गोष्टी सामाईक असतात. या घटकांमुळे काही आजार तुम्हाला होण्याची शक्यता आहे की नाही याची माहिती मिळते.

आपली जनुकं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असतात. शरीर कसे वाढेल, कसं काम करे, कसं दिसेल हे ते ठरवतात. या जनुकांमध्ये काही बिघाड (जीन फॉल्ट, म्युटेशन) झाल्यास कधीकधी कर्करोग उद्भवतो.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.