Satara: बाहेरच्या जिल्ह्याचे दिव्यांग प्रमाणपत्र; शिक्षकांचा बदलीसाठी प्रताप; ग्रामविकासमंत्री लक्ष घालणार का?
esakal May 19, 2025 08:45 PM

-रूपेश कदम

दहिवडी : सोयीच्या ठिकाणी बदली मिळावी, यासाठी दिव्यांगाचे बनावट प्रमाणपत्र मिळविल्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर काही शिक्षकांची बनावट दिव्यांग यादी ‘सकाळ’च्या हाती लागली असून, ही प्रमाणपत्रे बाहेरच्या जिल्ह्यातून प्रमाणपत्र प्राप्त करून घेतली आहेत. दरम्यान, संवर्ग १ चा लाभ घेऊन बदलीसाठी उलटसुलट प्रकार करणाऱ्या शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत.

दैनिक ‘सकाळ’ने बनावट दिव्यांग शिक्षकांवर होणार कारवाई, बदलीसाठी विविध फंडे वापरणाऱ्या शिक्षकांची तंतरली, बनावट प्रमाणपत्रधारकांवर कारवाई करा तसेच प्रमाणपत्रांऐवजी प्रत्यक्ष दिव्यांगांची तपासणी करा या मथळ्यांखाली सातत्याने वृत्त प्रसिद्ध करून संवर्ग एक मधील गैरप्रकारांकडे शिक्षण विभागाचे लक्ष वेधले. या वृत्तांची दखल घेऊन शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी दिव्यांगांच्या प्रमाणपत्रांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते.

या पार्श्वभूमीवर काही शिक्षकांची बनावट दिव्यांग यादी ‘सकाळ’च्या हाती लागली आहे. यातील बहुतांशी दिव्यांग शिक्षक हे कर्णबधिर आहेत. हे कर्णबधिर शिक्षक रोजच्या जीवनात तसेच शाळेत शिकवताना कोणतेही वैद्यकीय उपकरण वापरताना दिसत नाहीत. त्यामुळे हे खरंच कर्णबधिर आहेत का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे अपवाद वगळता काही शिक्षकांना सेवेत आल्यानंतर दिव्यांगत्व आले आहे. दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यासाठी रहिवासी दाखला ग्राह्य धरला जातो, तसेच ज्या जिल्ह्याचा रहिवासी त्या जिल्ह्यातच दिव्यांग प्रमाणपत्र मिळते.

मात्र, काहींनी सातारा जिल्ह्याचे रहिवासी असताना बाहेरच्या जिल्ह्याचा रहिवासी पत्ता दाखवून दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त करून घेतले आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेने याबाबत केवळ जुजबी कारवाई न करता बनावट प्रमाणपत्रधारकांवर कडक कारवाई करावी, अशी अपेक्षा शिक्षकांमधून होत आहे.

बदलीसाठी असेही प्रकार

बदलीसाठी बनावट दिव्यांग प्रमाणपत्राप्रमाणे घटस्फोटीत, कुटुंबातील व्यक्तीला दुर्धर आजार असल्याचे दाखविण्यात आले आहे.

मंत्री गोरेंनी लक्ष घालण्याची मागणी

ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालावे, अशी अपेक्षा अनेक खऱ्या दिव्यांग शिक्षकांनी तसेच प्रामाणिक शिक्षकांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.