Mobile Overuse : मोबाइल अतिवापराने पाठ, मणक्याचे आजार; लहानांसह मोठे लोकही आहारी, दहा जणांमागे पाच ते सहा रुग्णांचे प्रमाण
esakal May 19, 2025 08:45 PM

कुटुंबातील लहान, तरुणांसह ज्येष्ठांमध्येही मान आणि पाठीचे विकार वाढले आहेत. मोबाईलचा अतिवापर हे विकार वाढण्यामागे मुख्य कारण असल्याचे मत शहरातील डॉक्टरांनी व्यक्त करत आहेत. दिवसाला दहापैकी पाच ते सहा रुग्णांना मान आणि पाठीचा आजार जडल्याची माहिती डॉक्टर देत आहेत.

शहर परिसरातील कंपन्यांमध्ये काम करणारा मोठा वर्ग आहे. अनेकांंचे सतत संगणकासमोर बसून काम चालत असते. कोविड काळातील ‘वर्क फ्रॉम होम’ मुळे घरी बसून अनेकांना सतत मोबाइल तसेच लॅपटॉपवर काम करण्याची सवय झाली आहे.

कोविड संपल्यानंतर काही कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम सुरूच ठेवले; तर काही शाळांमध्ये मोबाइलवरून ऑनलाइन शिकवण्या सुरू केल्या. या कारणाने मुलांना मोबाइलची सवय जडली. तेव्हापासून त्यांच्या हातचा मोबाईल अजूनही गेलेला नाही. आता तर तीन ते चार वर्षांच्या मुलाच्या हातातही मोबाइल दिला की मुले शांत बसत असल्याने पालक वर्ग मुलांच्या हाती मोबाईल देऊन आपापल्या कामात व्यस्त असतात.

  • फावला वेळ घालविण्यासाठी मोबाइलचा वापर करू नये

  • रात्री झोपण्याअगोदर एका तासापूर्वी मोबाइल हाती घेऊ नये

  • अन्यथा झोप होत नाही, त्याने मुले अथवा ज्येष्ठांमध्ये चिडचिडेपणा येतो

  • जेवताना मुलांच्या हाती मोबाइल देणे पूर्णपणे टाळावे

  • लहान मुलांचे रडण थांबविण्यासाठी त्याच्या हाती दिलेला मोबाईल घातक ठरू शकतो

  • डोळ्यांचे विकार वाढतात

  • मोबाइल बघत बसल्यापेक्षा मुलांना मैदानी खेळासाठी प्रवृत्त करावे

  • ज्येष्ठांनी एका जागेवर बसून मोबाईल पाहत बसण्यापेक्षा बाहेर फेरफटका मारण्यास जावे

  • तरूणांनी धावणे तर ज्येष्ठांसाठी चालण्याचा व्यायाम फायदेशीर आहे

  • पाठ आणि मानेच्या विविध प्रकारच्या व्यायामासाठी वैद्यकीय तज्ञांचा सल्ला घ्यावा

  • मोबाईल तास न तास पाहण्याने डोळ्यांवर दुष्परिणाम. त्यामुळे अतिवापर टाळावा

  • पहाटे उठून डोळ्यांचा व्यायाम करावा

  • मान आणि पाठ मजबूत करण्यासाठी व्यायाम करावेत

  • बसताना किंवा उभे असताना मणक्याला योग्य आधार द्या

  • वॉइस कमांड किंवा हँड्स-फ्री पर्याय वापरा, त्यामुळे स्क्रीनकडे सतत पाहण्याची गरज कमी होईल

काय होतात दुष्परिणाम ?

मानेच्या मणक्यांमध्ये सर्वाधिक हालचाल होत असल्याने घर्षण आणि त्यामुळे होणारी झीजही अधिक होते. मोबाईल वापराने मानेच्या मणक्यांवर आणि स्नायूंवर ताण पडतो. त्याने मणक्यांची झीज लवकर सुरू होते. त्यामुळे मणक्यांतील चकत्या सरकणे, नसांवर दाब येणे, या गोष्टी मणक्यांना सर्वाधिक बाधित करतात. परिणामी, शस्त्रक्रिया तसेच सततच्या उपचारांची गरज भासते. माण आणि खांदेदुखी सोबतच डोकेदुखीचा देखील त्रास सुरू होतो. खांदे पुढे वळणे (सतत पुढे झुकून बसल्यामुळे), सततच्या कुबड काढलेल्या स्थितीने पाठदुखी आणि कंबरदुखीचा त्रास होत आहेत.

ज्येष्ठांच्या विरंगुळ्याचे साधन

सेवानिवृत्तीनंतर अथवा वयाची साठी ओलांडल्यावर घरातील कामाची जबाबदारी मुलांवर येते. शरीर थकल्याने कुठलेही काम होत नसल्याने बऱ्याच नागरिकांचे घराबाहेर पडणेही शक्य नसते. वेळ घालविण्यासाठी विरंगुळा म्हणून युट्यूब तसेच फेसबुक सारख्या सोशल मीडियाचा सतत वापर होत आहे. परंतु, यामुळे ज्येष्ठांनाही अनेक विकार जडत आहे.

मोबाईल फोनचा अतिवापर आणि चुकीच्या बसण्याच्या सवयींमुळे अनेक मणक्यांसंबंधी समस्या उद्भवतात. यामध्ये सर्वात सामान्य समस्या म्हणजे ‘टेक्स्ट नेक’, जी दीर्घकाळ मान पुढे झुकवून स्क्रीनकडे पाहिल्याने होते. या चुकीच्या अवस्थेमुळे मान आणि मणक्यांवर ताण येतो. मोबाइलचा अतिवापर टाळून लहान मुलांना मैदानी खेळांकडे वळवा. आरोग्यासाठी योग्य सवयी अंगीकारा आणि मणक्यांचे आरोग्य जपा.

- डॉ. विष्णू नांदेडकर, अस्थिरोगतज्ज्ञ

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.