Vijay Wadettiwar : मुंबई : भारताचे नवे सरन्यायाधीश भूषण गवई रविवारी मुंबई दौऱ्यावर होते. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलकडून मुंबईमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला. मात्र, सरन्यायाधीश मुंबई दौऱ्यावर असताना राज्यातील महत्त्वाचे अधिकारी अनुपस्थित होते. राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक, मुंबईचे पोलीस आयुक्त हे या कार्यक्रमाला गैरहजेर होते. याबद्दल सरन्यायाधीशांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि मुख्य सचिव सुजाता सौनिक या दादर येथील चैत्यभूमी येथे पोहोचल्या. सरन्यायाधीशांनी जाहीर नाराजी व्यक्त केल्यानंतर वरिष्ठ अधिकारी कार्यक्रमाला हजर झाले. यावरून राज्यातील कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. तसेच ही चूक कोणाची असा सवालही केला आहे. (congress leader vijay wadettiwar slams mahayuti govt officials over cji gavai’s disrespect)
प्रोटोकॉल पाळला न गेल्याने सरन्यायाधीश भूषण गवई यांनी रविवारी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात जाहीर नाराजी व्यक्त केली. यामुळे अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील या प्रकरणावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. यासंदर्भात एक पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर केली आहे. महाराष्ट्राचा सुपुत्र जिद्द आणि चिकाटीने देशातील सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदी पोहोचतो आणि त्याच्याच राज्यात सरकारकडून अपमान होतो ही अत्यंत वाईट घटना असल्याचे वडेट्टीवार म्हणतात.
हेही वाचा – Operation Sindoor : सुवर्ण मंदिरही होते पाकिस्तानच्या निशाण्यावर… पण असा झाला पाकिस्तान नामोहरम
महाराष्ट्र सरकारमध्ये बसलेल्या सत्ताधाऱ्यांना आणि उच्चपदावर असलेल्या अधिकाऱ्यांना न्यायसंस्थेचा राग आहे का, साधा प्रोटोकॉल पाळता येत नाही का, असा सवाल करतानाच वडेट्टीवार याची जबाबदारी सरकार आणि संबंधित प्रशासकीय अधिकारी घेणार का, अशी विचारणा करतात. तसेच यात कोणाची चूक आहे, हे तरी किमान स्पष्ट करावे असेही वडेट्टीवार म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायमूर्ती भूषण गवई यांनी शपथ घेतली. महाराष्ट्रातही ते उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते. सरन्यायाधीशपदी निवड झाल्यानिमित्त महाराष्ट्र आणि गोवा बार काऊन्सिलतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी यावेळी महाराष्ट्रातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवरून सरन्यायाधीशांनी नाराजी व्यक्त केली. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश महाराष्ट्राचे असून पहिल्यांदाचा महाराष्ट्रात येत आहेत. अशा वेळी प्रोटोकॉल पाळला गेला पाहिजे, असे सरन्यायाधीश गवई यांनी म्हटले.
कार्यक्रमानंतर सरन्यायाधीश गवई चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी पोहोचले. तेथे मात्र, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि राज्याच्या मुख्य सचिव सौनिक पोहोचल्या.