लातूर : शहरातील लातूर-बार्शी रस्त्यावरील उड्डाणपुलावर आज संध्याकाळच्या सुमारास भीषण अपघाताची (Accident) घटना घडली. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले असून दोन जण गंभीर जखमी आहेत. लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जखमींवर उपचार सुरू आहेत. अपघात होताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर, पोलिसांच्या (Police)मदतीने जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र, अपघात एवढा भीषण होता की रिक्षामधील तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. लातूर (Latur) बार्शी रस्त्यावरील उड्डाणपुलावर ट्रॅक्टरला ऑटो रिक्षाने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली.
शहरातील उड्डाणपुलावर ऑटो रिक्षाने ट्रॅक्टरला पाठिमागून धडक दिल्याने हा अपघात झाला, हा अपघात एवढा भीषण होता की ऑटो रिक्षा चक्काचूर झाला आहे. या घटनेत ऑटो रिक्षामधील तीन लोकांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी आहेत. तर, एका प्रवाशाला किरकोळ मार लागला आहे. प्रतीक्षा संतोष पस्तापुरे (वय 10) राहणार बारा नंबर पाटी लातूर, सुमन सुरेश धोत्रे (वय 25) रा. सावेवाडी लातूर आणि शिवाजी दयानोबा कटलाकुटे (वय 62) वर्ष राहणार बारा नंबर पाटी लातूर, अशी या अपघातात ठार झालेल्या तिघांची नावे आहेत. यातील दोन गंभीर जखमी रुग्णावर लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. या दोघांना डोक्याला जबर मार लागल्याची माहिती आहे.
दरम्यान, याबाबत एमआयडीसी पोलीस ठाणे लातूर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. घटनेची माहिती मिळतात तात्काळ पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं. जखमींना लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच, घटनेची माहिती कळताच यातील मृत आणि अपघातग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मोठी गर्दी केली होती. मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश पाहून उपस्थितांनाही गहिवरुन आले.
अधिक पाहा..