सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी
Pune Man Posing as Airforce Officer Caught by Police : हवाई दलात अधिकारी असल्याचे भासवून फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला पुण्यात अटक करण्यात आली आहे. पुणे शहरातील खराडी पोलीस आणि दक्षिणी कमांड मिलिटरी इंटेलिजन्स यांनी एकत्र कारवाई करत हवाई दलाचा तोतया जवानाला अटक केली. आरोपी गौरव कुमार (वडिलांचे नाव - दिनेश कुमार) याच्या संशयास्पद हालचालींबाबत माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली आहे.
शहर खराडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून फसवणुकीसाठी वापरले गेलेले काही साहित्य जप्त करण्यात आले, ज्यामध्ये दोन हवाई दलाचे टी-शर्ट, एक हवाई दलाचा कॉम्बॅट पँट, एक जोडी हवाई दलाचे कॉम्बॅट शूज, दोन हवाई दलाचे बॅजेस, एक ट्रॅक सूट अप्पर समाविष्ट आहे, अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली. अधिक तपास खराडी पोलिस करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गौरव कुमार याने वायुसेनेची बनावट ओळख तयार करून अनेक महिलांशी संपर्क साधला होता. तो स्वतःला वायुसेना अधिकारी असल्याचे सांगत महिलांचा विश्वास जिंकायचा. या फसवणुकीचा बिंग मिलिट्री इंटेलिजन्सला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे फुटले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत गौरवला ताब्यात घेतले. त्याच्याकडे बनावट कागदपत्रे आणि वायुसेनेच्या गणवेशाचा वापर करत असल्याचे पुरावे आढळले.
तपासात असे समोर आले आहे की, गौरवने अनेक महिलांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्याच्या या कृत्यामुळे अनेकजण फसवणुकीला बळी पडले असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध फसवणूक आणि बनावट कागदपत्रांचा वापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सध्या त्याची कसून चौकशी सुरू असून, इतर संभाव्य पीडितांची माहिती गोळा केली जात आहे.