भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीर (PoK) मधील एकूण ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ला करत निर्णायक पाऊल उचलले आहे. या कारवाईत अनेक दहशतवादी ठिकाणांचा विनाश झाला असून, भारताने पहलगाममध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याचा जोरदार प्रतिशोध घेतला आहे.
या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी लष्करी तज्ज्ञ कमर चीमा यांनी सोशल मीडियावर काही ट्विट करत भारताच्या कारवाईचे पुरावे सादर केले आहेत. त्यांनी हवाई हल्ल्यांनंतरच्या क्षणांचे व्हिडीओ शेअर करत दावा केला आहे की, "पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला असून, भारताला प्रत्युत्तर देण्याशिवाय आता पाकिस्तानाकडे पर्यायच उरलेला नाही."
भारतीय हवाई हल्ल्यांनंतर आता पाकिस्तानने पहिल्यांदाच कबूल केले आहे की, त्यांच्या ५ शहरांमध्ये (बहावलपूर, कोटली, मुजफ्फराबाद, मीरपूर आणि रावळपिंडी) हल्ला झाला असून त्यात ३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही माहिती स्थानिक मीडियामार्फत समोर आली आहे आणि यामुळे भारताच्या ऑपरेशनच्या यशस्वीतेवर शिक्कामोर्तब झाले आहे.
भारताने १५ दिवसांपूर्वी पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा निष्कर्ष काढत ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू केले. या अंतर्गत पाकिस्तान आणि PoK मधील विविध ठिकाणी लक्ष्य करत हवाई स्ट्राइक करण्यात आली. माहितीप्रमाणे, या दहशतवादी ठिकाणांवर भारतविरोधी कट रचला जात होता.