भारतानं पाकिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. भारतीय सैन्यानं 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केलं आहे. याबाबत भारत सरकारने काही काळापूर्वी एक निवेदन जारी करून माहिती दिली आहे.
भारत सरकारने आपल्या निवेदनात म्हटलं आहे, "या कारवाईत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य करण्यात आलं आहे. याच ठिकाणावरून भारतावर दहशतवादी हल्ल्यांचा कट झाला आणि त्याची अंमलबजावणी करण्यात आली,"
ऑपरेशन सिंदूरमध्ये एकूण 9 ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलं आहे, अशीही माहिती निवेदनात दिली आहे.
दुसरीकडे, पाकिस्तानच्या सरकारी टीव्हीने पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्याचा हवाला देत म्हटलं की, भारतीय सैन्याने पाकिस्तानवर तीन ठिकाणी क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे.
रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानच्या सीमावर्ती भागातूनही जोरदार गोळीबार आणि मोठ्या स्फोटांचे वृत्त येत आहे.
22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध अत्यंत तणावपूर्ण बनले आहेत. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)