- डॉ. प्रीती जोशी, लिबरल आर्ट्स तज्ज्ञ
आजच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात ह्युमॅनिटीज (मानवी विद्याशाखा) या अभ्यासक्रमाची उपयुक्तता अनेकदा प्रश्नांकित होते. मात्र राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० (एनईपी) लागू झाल्यापासून शिक्षणाच्या क्षेत्रात एक नवा दृष्टिकोन तयार होत आहे. यामुळे ह्युमॅनिटीज पुन्हा केंद्रस्थानी येत आहेत आणि व्यापक, समग्र व भविष्यकालीन शिक्षणाचा अविभाज्य भाग बनत आहेत.
‘एनईपी’ बहुविषयक शिक्षणाला प्रोत्साहन देते, ज्यामुळे विज्ञान, वाणिज्य किंवा कला शाखेतील विद्यार्थी कोणताही विषय अभ्यासू शकतात. म्हणजेच, संगणकशास्त्र शिकणारा विद्यार्थी आता तत्त्वज्ञान, नीतिशास्त्र आणि साहित्य हेही समांतरपणे शिकू शकतो. यामुळे तर्क आणि सहानुभूती, विश्लेषण आणि सौंदर्यशास्त्रयांचं समतोल नातं तयार होतं जे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात फार महत्त्वाचं ठरतं.
यासंदर्भात प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ हॉवर्ड गार्डनर यांचं वाक्य आठवतं की, विद्यार्थ्यांनी शिकावयाची सर्वांत मौल्यवान गोष्ट म्हणजे विविध विषयांमध्ये दुवा जोडत सीमांच्या पलीकडे विचार करण्याची कला. या दृष्टिकोनातून ‘एनईपी’ ही केवळ अभ्यासक्रमात बदल करणारी नव्हे, तर विचारधारेतील क्रांती घडवणारी शैक्षणिक भूमिका बजावत आहे. ‘एनईपी’ अंतर्गत ह्युमॅनिटीजला पुन्हा नव्या अर्थाने आकार दिला जात आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता प्रक्रिया स्वयंचलित करू शकते, परंतु त्यात नैतिकता, सर्जनशीलता आणि सांस्कृतिक जाणिवेचा अभाव असतो. हे सगळं ह्युमॅनिटीजच्या अभ्यासातून विकसित होतं. भविष्यात केवळ तंत्रज्ञानावर चालणारे नव्हे तर नैतिकदृष्ट्या जागरूक, सांस्कृतिकदृष्ट्या संवेदनशील विचारवंतांची गरज भासणार आहे. इथेच भारतीय ज्ञान प्रणालीचं महत्त्व वाढतं.
शतकानुशतकांची यशस्वी परंपरा लाभलेल्या या ज्ञानप्रणालीमध्ये आयुर्वेद, योग, भारतीय तर्कशास्त्र, पर्यावरणशास्त्र, तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र, प्रशासन आणि सौंदर्यशास्त्रयांचा समावेश आहे. यांना अभ्यासक्रमात स्थान दिल्यास केवळ सांस्कृतिक वारसा जपता येईल असं नव्हे, तर आंतरराष्ट्रीय प्रश्नांनाही भारतीय संदर्भात उपाय सुचवता येतील व नव्या संधी तयार होतील.
उदाहरणार्थ, आयुर्वेद, योग, पर्यावरणीय नीतिशास्त्र या गोष्टी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आरोग्य, वेलनेस आणि जबाबदारीपूर्ण तंत्रज्ञानक्षेत्रात उपयुक्त ठरू शकतात. आज डेटा सायन्स + नीतिशास्त्र, कृत्रिम बुद्धिमत्ता + तत्त्वज्ञान व संस्कृती यांसारखे अभ्यासक्रम तयार होत आहेत, जे विद्यार्थ्यांना नवे कौशल्य व नितीमुल्यांसह तयार करत आहेत.
ह्युमॅनिटीजमध्येही नव्या वाटा खुल्या होत आहेत. अध्यापन, प्रशासन याशिवाय आता डिजिटल कंटेंट, सांस्कृतिक विश्लेषण, पॉलिसी रिसर्च, युऐक्स रिसर्च, एथिकल एआय डिझाइन अशा क्षेत्रांमध्येही संधी आहेत.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय ज्ञान प्रणाली यांच्या एकत्र येण्याने विकसित होणाऱ्या ह्युमॅनिटीजच्या विद्यार्थ्यांना केवळ करिअर नव्हे, तर नवा दृष्टिकोन, सहवेदना आणि नेतृत्वाची प्रेरणा देऊ शकतात. भविष्य हे केवळ यंत्रांवर प्रभुत्व मिळवणाऱ्यांचे नसून, तंत्रज्ञानात मानवी संवेदना आणि मूल्यांचा समावेश करणाऱ्यांचे आहे.