जम्मू-काश्मीरमधील पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण भारतीयांकडून पाकिस्तानी दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्याची मागणी केली जात होती. मंगळवारी रात्री भारतीय लष्कराने हवाई हल्ल्याद्वारे पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करत चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत ही मोठी कारवाई भारतीय सैन्याकडून झाली आहे. यावर आता पाकिस्तानी कलाकारांकडून प्रतिक्रिया समोर येत आहे. हानिया आमिर, माहिरा खान यांसारख्या पाकिस्तानी सेलिब्रिटींनी भारताकडून झालेल्या या हवाई हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे याच सेलिब्रिटींनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला होता.
पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरने तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. त्यात तिने लिहिलं, “माझ्याकडे सध्या कोणतेही चांगले शब्द नाहीत. माझ्याकडे फक्त राग, वेदना आणि दुखावलेलं हृदय आहे. एक मूल गेलं, कुटुंब विखुरली गेली आणि हे सर्व कशासाठी? अशा प्रकारे तुम्ही कोणाचंही रक्षण करत नाही. ही निव्वळ क्रूरता आहे. तुम्ही निष्पाप लोकांवर बॉम्ब टाकून त्याला रणनिती म्हणू शकत नाही. ही ताकद नाही, हा भ्याडपणा आहे. आम्ही तुम्हाला पाहत आहोत.”
पाकिस्तानमधील प्रसिद्ध अभिनेत्री माहिरा खानने लेखिका फातिमा भुट्टे यांच्या ट्विटला रिपोस्ट करत भारताच्या हवाई हल्ल्याची निंदा केली. “खरंच हा भ्याड हल्ला आहे. अल्लाह आमच्या देशाची रक्षा करो”, असं तिने लिहिलं आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने हानिया आणि माहिरासह अनेक पाकिस्तानी कलाकारांचे सोशल मीडिया अकाऊंट्स भारतात बंद केले होते.
22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पहलगाममधील बैसरन पठारावर पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात 26 जणांनी आपले प्राण गमावले होते. पहलगाम हल्ल्यानंतर हानियाने सोशल मीडियावर पोस्ट लिहित निषेध व्यक्त केला होता. ‘कुठेही घडणारी दुर्घटना ही सर्वांसाठी एक दुर्दैवी घटना असते. अलिकडेच घडलेल्या घटनांमध्ये ज्या निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले, त्यांच्यासाठी माझ्या मनात संवेदना आहेत. दु:खाची भाषा एकच असते. आपण नेहमीच माणुसकीची निवड करुया’, असं तिने लिहिलं होतं.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या दोन आठवड्यांनंतर भारतीय सशस्त्र दलांनी मंगळवारी रात्री उशिरा पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) नऊ दहशतवादी छावण्यांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. ज्यात लष्कर-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा बालेकिल्ला असलेल्या बहावलपूरचाही समावेश आहे. भारताने असंही स्पष्ट केलंय की कोणत्याही पाकिस्तानी लष्करी आस्थापनेला लक्ष्य केलेलं नाही. भारताने लक्ष्यांची निवड आणि त्यांची अंमलबजावणी करण्याच्या पद्धतीमध्ये खूप संयम दाखवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’चं बारकाईने निरीक्षण केलं.