स्थळ : अज्ञात. वेळ : अज्ञात.
रिकाम्या खोलीत तीन खुर्च्या... तीनच. चौथी नाही! होती ती आल्या आल्या कुणीतरी फोल्ड करुन ठेवली आहे. महाराष्ट्राचे तीन कारभारी या खुर्च्यांचे धनी आहेत. बराच वेळ तिघेही काहीही बोलत नाहीत. अब आगे...
भाईसाहेब : (घुश्शात) मी बघतॉय! मी बघतॉय! तुमच्यात खाणाखुणा चालू आहेत काही तरी! हे महायुतीच्या धर्माला अनुसरुन वागणं नव्हं!!
दादासाहेब : (आरोप झटकत) छे, मी कशाला खाणाखुणा करु? मी आपला सहज आळस दिला इतकंच! कंटाळा आलाय जाम! सतत तीच आकडेवारी, त्याच निधीच्या रकमा, त्यांचं वाटप... अर्थमंत्र्याला फार काम पडतं!!
नानासाहेब : (दुजोरा देत) मीसुद्धा नेमका तेव्हाच आळस दिला म्हणून तुमचा गैरसमज झाला की आम्ही खाणाखुणा करतोय!!
भाईसाहेब : (रागावून) मखलाशी करू नका, मी ठाण्याचा आहे!!
नानासाहेब : (आव्हान सहन न होऊन) तुम्ही ठाण्याचे असाल तर मी नागपूरचा आहे!
दादासाहेब : (दर्पोक्तीनं) मी तर डायरेक्ट बारामतीचाच आहे, आता बोला!
भाईसाहेब : (तोंड फिरवत) आम्ही नाही बोलणार! ज्जा!! आधी मी कॉमन मॅन होतो, आता डेडिकेटेड कॉमन मॅन आहे! आणि म्हणूऽऽन... (हळूचकन खाली कागद वाचून) बट नेव्हर अंडरएस्टिमेट द पॉवर ऑफ धी डेडिकेटेड कॉमन मॅन!!
नानासाहेब : (समजूत घालत) काही तरी गैरसमज होतोय तुमचा, भाईसाहेब! दादासाहेब अगदी न्यायबुद्धीचे आहेत, कुण्णा कुण्णाचा निधी अडवत नाहीत!!
दादासाहेब : (खांदे उडवत) मी कशाला कुणाचे निधी अडवू? ते काय धरणातलं पाणी आहे? पण तिजोरीतच खडखडाट असल्यावर काय करणार? कसलंही सोंग आणता येतं, पण पैशाचं सोंग आणता येत नाही!!
भाईसाहेब : (संतापून) हा मला टोमणा होता का?
नानासाहेब : (खेळीमेळीनं) तुम्ही हल्ली सारखे नाराज होता बुवा! ये गुस्सा थूक दो!! दादासाहेब, द्या हो यांना जरा निधी बिधी! तुम्हीही उगाच हात आखडता नका घेऊ! नाही म्हटलं तरी आपण महायुतीत आहोत, युतीधर्म पाळायला हवा की नको?
दादासाहेब : (जबाबदारी झटकत) तुम्ही लेखी आदेश द्या, मी कर्ज काढून निधी देतो यांना!!
भाईसाहेब : (स्वाभिमानाने) काही गरज नाही, मुद्दा स्वाभिमानाचा आहे!
नानासाहेब : (गांभीर्यानं) गेले काही दिवस मी बघतोय, तुम्ही फार नाराज आहात! उठसूट दरे गावात शेती करायला जाता! कार्यक्रमांनाही जाणं बंद केलंय तुम्ही!
दादासाहेब : (नापसंतीनं) परवा मी सगळ्या माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला, हे आलेच नाहीत! शाल-श्रीफळ स्वीकारायला माणूस पाठवतो म्हणाले... हा काय युतीधर्म म्हणायचा का?
भाईसाहेब : (तोऱ्यात) मी बिझी होतो...
नानासाहेब : (भांडण मिटवण्याच्या प्रयत्नात) ते जाऊ दे! आपल्यात आता भांडणं नकोत! मग आपल्यात आणि त्या महाभकास आघाडीत फरक काय राहिला? आपल्याला महाराष्ट्र गतिमान करायचाय!
दादासाहेब : (बेफिकिरीनं) करा की! माझी तर सध्या काहीच नाराजी नाही! मी युतीधर्म पाळतोय!!
भाईसाहेब : (थंडपणानं) अस्सं? मग मी नाराज आहे, ही सुद्धा अफवाच आहे! हा मी निघालो पुन्हा गावाला!!
नानासाहेब : (काकुळतीनं) अहो, असं नका करु!! जस्ट चिल, आम्ही काय केलं तर तुम्ही हसाल? प्लीज हसा ना!
दादासाहेब : (विनवणीच्या सुरात) मी एखादा फर्मास, गावरान विनोद करु का? काय करू, ते सांगा!!
भाईसाहेब : (एक डेडली पॉज घेत) मला पुन्हा कॉमन मॅन व्हायचंय!!