आर्किटेक्चर (वास्तु विशारद) अभ्यासक्रम हा बारावीनंतर पाच वर्षांचा पदवी अभ्यासक्रम असून तो ‘काऊन्सिल ऑफ आर्किटेक्चर’ (COA) च्या मान्यतेने चालविला जातो. आर्किटेक्चर हे क्षेत्र व्यवसाय म्हणून प्रसिद्ध आहे. यामध्ये अभियांत्रिकी, कल्पकता, सौंदर्य, आणि मानव व्यवहार यांचा समन्वय असतो.
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) यांच्यामार्फत ‘नॅशनल अॅप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर (NATA)’ ही प्रवेश परीक्षा देशभरातील आर्किटेक्चर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी घेतली जाते. तसेच जेईई पेपर-२ ही परीक्षा नामांकित ‘एनआयटी’ व ‘एसपीए’ दिल्ली, भोपाळ, विजयवाडामध्ये प्रवेशासाठी आवश्यक आहे. भारतातील बहुतांश महाविद्यालये ‘नाटा’चा निकाल ग्राह्य धरून प्रवेश देतात.
पात्रता
आर्किटेक्चर कोर्समध्ये प्रवेशासाठी फिजिक्स, केमिस्ट्री व मॅथेमॅटिक्स विषयामध्ये ५० टक्के गुण आवश्यक असतात (गणित अनिवार्य विषय असावा). प्रवेशासाठी नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर किंवा जेईई पेपर-२ ही परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेतून मिळालेल्या गुणवत्तेनुसार प्रवेश मिळतो. किंवा दहावीनंतर अभियांत्रिकी डिप्लोमा उत्तीर्ण (गणित विषयासह) किमान ५० टक्के गुण आवश्यक. आयआयटीमध्ये आर्किटेक्चर प्रवेशासाठी ‘एएटी’ ही परीक्षा द्यावी लागते.
‘नाटा’द्वारे मिळणारे अभ्यासक्रम
‘नाटा’च्या आधारे देशभरातील विविध शासकीय, निमशासकीय व खासगी महाविद्यालयांमध्ये पाच वर्षांचा बी.आर्क. म्हणजेच बॅचलर ऑफ आर्किटेक्चर अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळतो. हा अभ्यासक्रम स्थापत्य डिझाइन, बांधकाम तंत्रज्ञान, रचनात्मक विचारसरणी व पर्यावरणपूरक आर्किटेक्चर यासारख्या विषयांवर आधारित असतो.
परीक्षेची रचना
‘नाटा’ ही संगणकावर आधारित परीक्षा असून ती दोन भागांत घेतली जाते. पहिला भाग सृजनात्मक व तार्किक विचारशक्ती, गणितीय समज, आंतरदृष्टी व डिझाइन समज यावर आधारित असतो. दुसऱ्या भागात दृश्य समज, संकल्पनाशीलता, गणनात्मक व विचार कौशल्यांची चाचणी घेतली जाते. गणित हे दहावीच्या गणितावर तर काही प्रश्न सामान्य ज्ञानाचे असतात.
‘नाटा’ व बोर्डाचे प्रत्येकी पन्नास टक्के गुण असे मिळून ‘कंपोझिट स्कोअर’ तयार होतो, म्हणून बोर्डाच्या गुणांनाही प्रवेशासाठी महत्त्व आहे. ही परीक्षा अहिल्यानगर, अकोला, अमरावती, संभाजीनगर, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नाशिक, नागपूर, नवी मुंबई, पुणे, सोलापूर या ठिकाणी दिली जाऊ शकते.
जेईई पेपर-२
ही ३ तासांची परीक्षा ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने घेतली जाते. गणित व अॅप्टिट्यूड ऑनलाइन, तर रेखाचित्र प्रश्न ऑफलाइन असतात. प्रत्येक बरोबर उत्तरास ४ गुण, चुकीसाठी १ गुण वजा केला जातो.
करिअरच्या संधी
विद्यार्थ्यांना स्वतंत्र व्यवसाय, सरकारी/निमसरकारी नोकऱ्या, इंटिरिअर, लँडस्केप डिझाईन, यु.डी.पी. प्लॅनिंग, ग्रीन बिल्डिंग्ज, सस्टेनेबल आर्किटेक्चर अशा विविध क्षेत्रांमध्ये संधी उपलब्ध आहेत. सरकारी विभाग, महानगरपालिका, तसेच बिल्डर्स, रिअल इस्टेट आणि टाऊनशिप प्रोजेक्ट्समध्ये नोकरी मिळू शकते. फ्रीलान्स प्रोजेक्ट्स घेऊन स्वतःचे ऑफिस सुरू करता येते.
प्रभावी तयारीसाठी
सृजनशील डिझाइन व स्केचिंगचा सराव, गणित व लॉजिकल रीझनिंगचा अभ्यास करणे आवश्यक आहे. तसेच वेळेचे व्यवस्थापन, आत्मविश्वास आणि परीक्षेचा मागोवा घेणे यामुळे यशाचा मार्ग सुलभ होतो.
महत्त्वाच्या लिंक
https://www.nata.in
https://jeemain.nta.nic.in
निष्कर्ष
स्थापत्य अभियांत्रिकी हे एक नावीन्यपूर्ण, सर्जनशील व समाजोपयोगी क्षेत्र आहे, ज्यामध्ये यशस्वी होण्यासाठी ‘नाटा’सारख्या परीक्षेत उत्तीर्ण होणे ही पहिली पायरी आहे.