बरोब्बर 15 दिवसांपूर्वीच म्हणजे 22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये बैसरन व्हॅलीत दहशतवाद्यांनी क्रूर हल्ला करत निष्पाप पर्यटकांना लक्ष्य केले. त्यामध्ये 25 भारतीय नागरिक आणि एक नेपाळी नागरिक अशा 26 जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर दोन आठवड्यांनी काल (7-8 मे मध्यरात्र) रात्री भारताने या हल्ल्याचा बदला घेत पाकव्याप काश्मीर आणि पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर मोठा हल्ला केला. त्यामध्ये दहशतवाद्यांचे 9 तळ उद्ध्वस्त झालेच आणि 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले. पाकिस्तानकडून अद्याप त्याच्या प्रत्युत्तरात कोणतंही मोठे विधान करण्यात आलेलं नाही. पण 4 अशी कारण आहेत, ज्यामुळे पाकिस्तान भारताविरुद्ध प्रत्युत्तर देऊ शकत नाही किंवा पलटवार करणार नाही, असे म्हटले जाते.
पहिलं कारण – वरिष्ठ नेतृत्व लढण्यास तयार नाही
सध्या पाकिस्तानात शाहबाज शरीफ यांचे सरकार सत्तेत आहे. शाहबाज हे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे धाकटे भाऊ आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण होते. अशा वातावरणातच शाहबाज नवाज यांना भेटले. या बैठकीत नवाज यांनी युद्ध न करण्यास सक्तीने सांगितले होते. जर युद्ध झालं तर तुमचा नाश होईल, असे सांगत नवाज शरीफ यांनी राजनैतिक मार्गाने तोडगा काढण्यास सांगितले होते.
याचाच अर्थ असा की पाकिस्तानचे सर्वोच्च नेतृत्व युद्ध लढण्यास तयार नाही. अशा परिस्थितीत, पाकिस्तान हा भारताने केलेल्या हल्ल्याचा बदला घेईल अशी शक्यता कमी आहे.
दुसरं कारण – फक्त दहशतवादी तळांवर हल्ला
काल मध्यरात्री भारताने पाकिस्तानमधील 9 ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक केले आहेत, पण ती सर्व ठिकाणे म्हणजे दहशतवाद्यांचे अड्डे आहेत. आम्ही पाकिस्तानशी नाही तर त्यांनी पोसलेल्या दहशतवाद्यांशी लढत आहोत असा मेसेज भारताने या स्ट्राईकद्वारे दिला आहे.
जर पाकिस्तानने भारताविरुद्ध प्रत्युत्तर दिले तर दहशतवादासाठी त्याला मोठा फटका बसेल. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी आधीच दहशतवाद्यांना आश्रय दिल्याची कबुली दिली आहे.
तिसरं कारण – IMF ची मीटिंग
9 मे रोजी कर्जाबाबत आयएमएफची बैठक प्रस्तावित आहे. या बैठकीतच आयएमएफ पाकिस्तानला कर्ज देण्याचा निर्णय घेईल. दोन दिवसांपूर्वी हल्ला करून भारताने पाकिस्तानला अडचणीत आणले आहे. त्यामुळे जर पाकिस्तानने प्रत्युत्तर दिले तर युद्धाची परिस्थिती निर्माण होईल आणि अशा परिस्थितीत पाकला आयएमएफकडून कर्ज मिळणार नाही. जर पाकिस्तानला आयएमएफकडून कर्ज मिळाले नाही तर देश दिवाळखोर होऊ शकतो. पाकिस्तानने आधीच चीनसारख्या देशांकडून खूप कर्ज घेतले आहे.
चौथं कारण – मोठ्या देशांचा सपोर्ट नाही
पाकिस्तानने यापूर्वी जेव्हा जेव्हा भारताशी युद्ध केले आहे तेव्हा तेव्हा त्याला अमेरिकेसारख्या देशांकडून पाठिंबा मिळाला आहे, परंतु यावेळी अमेरिका किंवा रशिया दोघेही पाकला पाठिंबा देत नाहीयेत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारतीय पंतप्रधानांशी फोनवरूनही चर्चा केली. दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करणे आवश्यक आहे,असे पुतीन म्हणाले होते.
दहशतवादाच्या मुद्द्यावरही अमेरिकेने पाकिस्तानची साथ सोडली आहे. चीनने पाकिस्तानला नक्कीच पाठिंबा दिला असला, तरीही त्यांना अद्याप तिथून कोणतीही ठोस मदत मिळालेली नाही. अशा परिस्थितीत पाकिस्तान युद्धात उतरण्याची शक्यता कमी आहे.