मीही मेलो असतो तर..; भारतीय हल्ल्यात संपूर्ण कुटुंब ठार झाल्यानंतर मसूद अजहरची प्रतिक्रिया
GH News May 07, 2025 03:10 PM

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर म्हणून भारताने मंगळवारी रात्री 1.05 वाजता ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवलं. ज्यामध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आलं. पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबाद, कोटली आणि बाग तसंच पंजाब प्रांतातील बहावलपूरमधील मुरीदके आणि अहमदपुरा शार्किया इथं नऊ दहशतवादी स्थळांवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद (JeM) या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अजहरच्या कुटुंबातील 14 जण ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. बहावलपूर हे मसूद अजहरचं मूळ गाव असून भारताने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये त्याची पत्नी, मुलगी, भाऊ-बहिणींसह संपूर्ण कुटुंब ठार झाल्याचं कळतंय. यानंतर अजहरची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

संपूर्ण कुटुंब संपल्यानंतर मसूद अजहर अक्षरश: रडला. या हल्ल्यात मीसुद्धा मेलो असतो तर बरं झालं असतं, अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे. मसूद अजहर हा संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेला जागतिक दहशतवादी असून बहावलपूरमध्ये तो मुक्तपणे फिरत असतो. 2002 मध्ये जैश-ए-मोहम्मदला अधिकृतपणे बेकायदेशीत घोषित करण्यात आलं असलं तरी ही बंदी केवळ कागदावरच असल्याचं दिसून येतं. कारण या दहशतवादी संघटनेद्वारे अनेक प्रशिक्षणाची शिबिरं चालवली जात आहेत. 1968 मध्ये बहावलपूर इथं जन्मलेला अजहर हा एकेकाळी अफगाणिस्तानातील हरकत-उल-मुजाहिद्दीनचा (HuM) सदस्य आणि धर्मगुरू होता. 1994 मध्ये दहशतवादाच्या आरोपाखाली भारतात त्याला अटक करण्यात आली होती. परंतु नंतर त्याला सोडण्यात आलं.

जानेवारी 2000 मध्ये त्याने कराचीमध्ये जैश-ए-मोहम्मदची स्थापना केली. तेव्हापासून ही दहशतवादी संघटना भारतातील अनेक मोठ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी आहे. ज्यात जम्मू-काश्मीर विधानसभा आणि भारतीय संसदेवरील हल्ल्याचाही समावेश आहे. मसूद अजहरला मूत्रपिंडाच्या समस्या असल्याचंही म्हटलं जातं. जून 2024 मध्ये तो शेवटचा एका लग्नात दिसला होता.

भारताने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये मसूद अजहरचा भाऊ रौफ अजहरसुद्धा मारल्या गेल्याचं कळतंय. भारतीय लष्कराने बहावलपूरमधील मसूद अजहरच्या मदरशाला लक्ष्य केलं. बहावलपूरच्या या मदरशावर चार क्षेपणास्त्रे डागण्यात आली. यामुळे हा संपूर्ण परिसर उद्ध्वस्त झाला आहे. या मदरशाचं नाव मरकज सुभानअल्लाह आहे. हा परिसर जैश-ए-मोहम्मदचं ऑपरेशनल मुख्यालय म्हणून ओळखलं जात होतं. बहावलपूरमधील हा मदरसा जैशचा प्रमुख मौलाना मसूद अजहरसह इतर अनेक दहशतवाद्यांचंही घर होतं. गेल्या तीन दशकांपासून या मदरशात दहशतवादी प्रशिक्षण शिबिरं सुरू आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.