शिक्रापूर - गेल्या कित्येक पिढ्या केवळ शेतात अपार कष्टात गेलेल्या भोसुरे परिवारातील बाबासाहेब भोसुरे यांचे संपूर्ण आयुष्य शेती आणि कुटुंब सांभाळण्यातच गेले. मात्र त्यांचा एकुलता एक मुलगा किरण भोसुरे याने कष्टकरी कुटुंबाचा या पुढील प्रवास प्रशासकीय सेवेच्या दिशेने नेत फौजदार पदाला गवसणी घातली.
त्याची आई जिजाबाई आणि संपूर्ण कुटुंब या यशाने आनंदित झाले असून, संपूर्ण केंदूरकरांचे आशीर्वाद लाभल्यानेच मी यशस्वी झाल्याची भावना किरण यांनी व्यक्त केली.
डोंगर गळ्याला, गावच्या एका दिशेला आणि नेहमीच दुष्काळी असलेली वस्ती म्हणजे केंदूर येथील भोसुरेस्थळ वस्ती. या वस्तीला कित्येक वर्षे रस्ताही नव्हता. अशाही स्थितीत किरण याने वाट तुडवत चार किलोमीटर दूर असलेल्या केंदूर येथील प्राथमिक व माध्यमिक शाळेत आपले शालेय शिक्षण पूर्ण केले.
पुढे पुण्यात बारावी सायन्स करून वाडिया कॉलेजमध्ये बी. कॉम व एम. कॉम पूर्ण करीत थेट स्पर्धा परीक्षेच्या तयारीला त्याने सुरुवात केली. सलग चार प्रयत्नांत त्याने मागील वर्षी नगरपरिषद लेखा परीक्षक म्हणून यश मिळविले असले, तरी त्याने ती ‘पोस्ट’ स्वीकारली नाही.
अखेर या वर्षी त्याने पोलिस उपनिरीक्षक (फौजदार) पदाला गवसणी घातली. त्याच्या या यशाने त्याची आई जिजाबाई, वडील बाबासाहेब आणि दोन विवाहित बहिणी यांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
त्याच्या यशात त्याचा मामेभाऊ आयटी अभियंता कुलदीप बोत्रे यांनी विशेष पाठबळ दिले, तर कठीण काळात मानसिक आधार देण्यात वैभव थोरात, सूरज फडतरे, आशिष कुंभार, देवेंद्र पचंगे या शालेय मित्रांचे मोठे योगदान आहे, असे त्याने आवर्जून सांगितले. दरम्यान, राज्य सेवेची येती परीक्षा तसेच यूपीएससीच्या परीक्षेची तयारी करीत असल्याचे त्याने सांगितले.
‘म्हाडा’चे सीईओ साकोरेंचे मार्गदर्शन
सलग चार वेळा परीक्षा देऊनही यश मिळत नसल्याने खचल्यासारखे झाले होते. मात्र या काळात परीक्षेबाबतचे, भविष्यातील प्रशासकीय संधीबद्दलच मार्गदर्शन पुणे म्हाडाचे सीईओ राहुल साकोरे यांनी चांगले मार्गदर्शन केल्याने मी बऱ्यापैकी सुखावलो व मला आधार मिळाला. कठीण काळात खूप कमी लोक सोबत राहतात, मात्र साकोरे साहेबांचा आधार महत्त्वाचा वाटल्याचेही त्याने आवर्जून सांगितले.