कुर्डू : ढवळस (ता. माढा) येथील जयंत वैजिनाथ इंगळे व शिवकन्या वैजिनाथ इंगळे या बहीण भावाने स्पर्धा परीक्षेत यश संपादन करून माढा तालुक्यात आदर्श निर्माण केला आहे. जयंत वैजिनाथ इंगळे याने महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात आलेल्या इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी या राजपत्रित पदासाठी घेण्यात आलेल्या परिक्षेत एसआबीसी प्रवर्गातून राज्यातून प्रथम क्रमांकाने यश संपादन केले आहे.
तर बहीण शिवकन्या वैजिनाथ इंगळे हिने कृषी विभागामार्फत घेण्यात आलेल्या कृषी सहायक पदासाठी यश संपादन करून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असलेल्या मुलींमध्ये एक आदर्श निर्माण केलेला आहे. जयंत इंगळे याने गावातील पहिला राजपत्रित अधिकारी होण्याचा मान मिळाला आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असलेल्या युवकांपुढे या बहीण भावाने एक आदर्श निर्माण केला आहे.
या भावंडांचे शिक्षण हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढवळस या ठिकाणी झाले असून, आई-वडील शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. या यशाबद्दल ग्रामस्थांकडून त्यांचा सन्मान करण्यात आला. ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असलेल्या युवकांपुढे बहीण भावांनी प्रेरणादायी कामगिरी केली आहे.