नोकरी करणाऱ्या प्रत्येकाला भविष्याची चिंता असते. त्यासाठी थोडे-थोडे पैसे जमा केले जातात. पण तुम्हाला कर्मचारी भविष्य निधी ( EPF ) बद्दल माहिती आहे का? हा एक सुरक्षित आणि फायदेशीर पर्याय आहे. दर महिन्याला पगारातून कापला जाणारा थोडासा हिस्सा कधी कधी आपल्याला कमी वाटतो, पण तोच हिस्सा भविष्यात तुमच्या आर्थिक स्थैर्याचा कणा ठरू शकतो. EPF म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ही योजना केवळ बचतीपुरती मर्यादित नाही, तर दीर्घकालीन आर्थिक सुरक्षिततेचं अत्यंत महत्त्वाचं साधन आहे
EPF म्हणजे कर्मचारी भविष्य निधी. ( Employees’ Provident Fund Organisation ) ही सरकारी योजना आहे. यात नोकरदार व्यक्ती दरमहा आपल्या पगाराचा काही भाग जमा करतो. कंपनीही तितकाच हिस्सा जमा करते. हे पैसे हळूहळू वाढतात आणि त्यावर दरवर्षी व्याज मिळते. निवृत्तीच्या वेळी ही रक्कम मोठी होते, ज्यामुळे खर्च भागवणं सोपं होतं. EPF मुळे भविष्याची चिंता कमी होते.
तुम्ही कंपनीत काम करता, तेव्हा तुमच्या पगारातून दरमहा 12% हिस्सा EPF साठी कापला जातो. कंपनीही 12% हिस्सा जमा करते. पण यापैकी काही रक्कम कर्मचारी निवृत्ती योजना (EPS) मध्ये जाते, तर बाकी EPF मध्ये जमा होते.
तुमचा मूळ पगार आणि महागाई भत्ता मिळून 25,000 रुपये आहे.
तुमच्या पगारातून 12% म्हणजे 3,000 रुपये EPF साठी कापले जातात.
कंपनीही 12% (3,000 रुपये) जमा करते. यापैकी 1,250 रुपये (15,000 च्या 8.33%) EPS मध्ये जातात, तर बाकी 1,750 रुपये EPF मध्ये जमा होतात.
म्हणजे दरमहा एकूण 4,750 रुपये (3,000 तुमचे + 1,750 कंपनीचे) EPF खात्यात जमा होतात.
या रकमेवर सरकारकडून व्याज मिळते, ज्यामुळे तुमची बचत आणखी वाढते.
सरकार दरवर्षी EPF वर व्याजदर ठरवते. 2024-25 साठी हा दर 8.25% आहे. हे व्याज एप्रिल 2024 ते मार्च 2025 पर्यंत जमा झालेल्या पैशांवर मिळेल. व्याजाची गणना दरमहा होते, पण ते वर्षअखेरीस खात्यात जमा होते. दरमहा 8.25% व्याज 12 ने भागल्यास अंदाजे 0.688% मासिक व्याज मिळते.
तुमच्या खात्यात एका महिन्यात 9,500 रुपये जमा झाले.
मासिक व्याज : 9,500 × 0.688% = 65.36 रुपये
EPF चा मोठा फायदा म्हणजे कर बचत. पण याला मर्यादा आहे. जर तुमचं वार्षिक EPF योगदान 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर अतिरिक्त रकमेवर मिळणारं व्याज कराच्या कक्षेत येते. 2.5 लाखांपर्यंतच्या योगदानावर मिळणारं व्याज करमुक्त आहे. जर तुम्ही सलग 5 वर्षे EPF मध्ये पैसे जमा केले, तर पैसे काढताना कर लागत नाही. पण खातं निष्क्रिय (डॉर्मेंट) झालं, म्हणजे 3 वर्षे योगदान झालं नाही, तर मिळणारं व्याज कराच्या कक्षेत येतं.