इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत बुधवारी चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध २ विकेट्सने विजय मिळवला. चेन्नईचा हा यंदाच्या हंगामातील तिसरा विजय ठरला, तर कोलकाता संघाला सहाव्या पराभवाला समोरे जावे लागले. या सामन्याला काहीशी भावनिक आणि अभिमानाची किनारही लाभली होती. त्याचा प्रत्येय सामन्यादरम्यानही आला.
या सामन्याच्या आधीच्या मध्यरात्री भारतीय सैन्याकडून 'ऑपरेशन सिंदूर' ही विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत भारतीय वायुदलाने पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीर (PoK) येथील ९ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केले.
२२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात ही मोहिम दहशतवादाविरोधात राबवण्यात आली. भारतीय सैन्याच्या या कामिगिरीला चेन्नई आणि कोलकाता सामन्यापूर्वी सलाम करण्यात आला होता. सामन्यापूर्वी भारताचे राष्ट्रगीत वाजवण्यात आले होते.
त्यानंतर जेव्हा सामना सुरू झाला आणि चेन्नई सुपर किंग्स फलंदाजी करत होती, त्यावेळी मैदानात 'माँ तुझे सलाम' हे गाणं वाजवण्यात आलं, त्यावेळी दोन्ही संघाचे एकत्र वंदे मातरम या ओळी एकत्र गाताना दिसले.
याची दृष्यही सामन्यादरम्यान दाखवण्यात आली. भारतीय सैन्याने ९ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केले. त्यामुळे भारतभरातून सैन्याचे कौतुक होत आहे.
सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ बाद १७९ धावा केल्या आहेत. अजिंक्य रहाणेने ४८ धावांची खेळी केली, तर मनिष पांडेने नाबाद ३६ धावा आणि आंद्रे रसेलने ३८ धावांची खेळी केली. चेन्नईकडून सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर १८० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग चेन्नईने १९.४ षटकात ८ विकेट्स गमावत पूर्ण केला. चेन्नईकडून डेवाल्ड ब्रेव्हिसने ५२ धावांची खेळी केली. शिवम दुबेने ४५ धावांची खेळी केली आणि उर्विल पटेलने ३१ धावांची खेळी केली. कोलतकाताकडून वैभव अरोराने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.