भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार, अनुभवी फलंदाज आणि युवा क्रिकेटपटूंचा मोठा भाऊ असलेल्या रोहित शर्मा याने बुधवारी 7 मे रोजी निवृत्ती घेत चाहत्यांना मोठा धक्का दिला. रोहित शर्माने इंग्लंड दौऱ्याआधी निवृत्तीबाबत निर्णय घेतला. रोहितला इंग्लंड दौऱ्याआधी कर्णधारपदावरुन हटवण्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरु होती. रोहितने या चर्चेदरम्यान थेट कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. रोहितने सोशल मीडियावरुन निवृत्तीची माहिती दिली. तसेच रोहितने निवृत्तीनंतर याच सोशल मीडिया पोस्टमधून पहिली प्रतिक्रियाही दिली.
रोहित शर्मा त्याच्या तोडफोड खेळीमुळे ‘हिटमॅन’ या नावानेही ओळखला जातो. हिटमॅनने इंस्टा स्टोरीतून निवृत्तीची माहिती दिली. रोहितने या इंस्टा स्टोरीत टीम इंडियाच्या टोपीचा फोटोसह मेसेज शेअर केला आणि निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. “मी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे”, असं रोहितने चाहत्यांना कळवलं.
“मला कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. इतके वर्ष तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी मी आभारी आहे. मी टीम इंडियासाठी एकदिवसीय क्रिकेट खेळणार”, असं म्हणत रोहितने चाहत्यांचे आभार मानले आणि वनडेत खेळत राहणार असल्याचं स्पष्ट केलं.