शिराळा : वारणा धरणाच्या (Warna Dam) पायथ्याशी वारणा नदीत बुडून बेपत्ता आशुतोष अशोक चौगुले (वय २६, अंकलखोप, ता. पलूस) याचा मृतदेह काल दुसऱ्या दिवशी तब्बल २६ तासांनी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास उखळू पुलाजवळ पाण्यावर तरंगताना आढळला. मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. आशुतोषचे चुलते गुंडा भाऊसो चौगुले (वय ६४, अंकलखोप, ता. पलूस) यांनी कोकरूड पोलिसांत फिर्याद दिली.
घटनास्थळ व कोकरूड पोलिसांनी (Kokarud Police) दिलेली माहिती अशी, की मंगळवारी आशुतोष मित्र नीलेश भाळवणे, शिवाजी भोसले, दौलत केंगार, सचिन खंडागळे, ओंकार केंगार, असिफ पळूजकर यांच्यासमवेत चांदोलीत आला होता.
दुपारी (Chandoli Dam) पायथ्याशी जेवण बनवले. नंतर नदीत आंघोळीसाठी उतरले. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे आशुतोष बुडू लागला. मित्र, स्थानिकांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रवाह वेगात असल्यामुळे तो वाहत गेला व बेपत्ता झाला. ग्रामस्थ व पोलिसांनी शोध घेतला. काल रात्री उशिरापर्यंत तो सापडला नव्ताह.
काल (बुधवारी) सकाळी ११ वाजता सांगली येथील स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक दाखल झाले. पथकातील कैलास वडर, सागर जाधव, आशिष सावंत, कृष्णा हेगडे, असिफ मकानदार, आकाश कोलप यांनी गळ टाकुन नदीत पाच तास शोध घेतला. मात्र मृतदेह मिळाला नाही. दुपारी चार वाजता शिराळा तहसीलदारमधून बोट मागवण्यात आली. बोटीने तपास करावयाचा म्हणून बोट जोडून पाण्यात सोडली. बोटीपासून उखळू पुलाजवळ काही अंतरावर मृतदेह तरंगताना आढळला.
दोन दिवसांपासून आशुतोषचे मित्र व अंकलखोप येथील ग्रामस्थ, नातेवाईकांसह पोलिस उपनिरीक्षक धनश्री मोहिते, हवालदार बी. डी. पवार, अभिजित पवार नदीकाठावर तळ ठोकून होते. कोकरुड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सहाय्यक पोलिस निरीक्षक जयवंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक कालिदास गावडे अधिक तपास करीत आहेत.
आई वर्षभरात दोन मुलांना मुकली२२ वर्षांपूर्वी आशुतोषच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. आशुतोष, आई सुजाता, बहीण रेवती असा तिघांचा परिवार होता. वर्षभरापूर्वी विवाहित बहीण रेवतीचा मृत्यू झाला. मंगळवारी आशुतोष पाण्यात बुडाला. सुजाता यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. वर्षात आई दोन मुलांना मुकली आहे.
एक बुडी ठरली अखेरचीअंघोळ करून जेवायचं म्हणून सर्वजण पोहायला गेले. अन्य मित्र त्याला बोलवत होते. तीन-चार वेळा आशुतोष बाहेर आला. पुन्हा पोहायला मिळणार नाही, म्हणून एक बुडी मारतो म्हणून गेला तो कायमचाच.
फिरायचं नियोजन आशुतोषचं१ मे रोजी आशुतोषने चांदोलीला जायचं नियोजन होतं. मात्र अन्य दोन मित्र न आल्याने नियोजन बदलून मंगळवारी (ता. ६) पुन्हा सर्वजण आले. मात्र जाताना सहलीचे नियोजन करणाऱ्या मित्राचा मृतदेह घेऊन जाण्याचं नियोजन करण्याची वेळ त्याच्या मित्रांवर आली.
पट्टीचा पोहणारा असूनही बुडालाआशुतोष पट्टीचा पोहणारा होता. पाण्यात बुडालेली विद्युत मोटार तो सहज बाहेर काढत असे. मात्र पट्टीच्या पोहणाऱ्या आशुतोषच्या दुर्दैवी मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होते आहे.