पोप फ्रान्सिस यांचे निधन झाल्यानंतर सर्वांचे लक्ष नवीन पोप कोण होतील याकडे होते. गेल्या काही दिवसांपासून पोप यांची निवड करण्याची प्रक्रिया व्हॅटिकन सिटीमध्ये सुरू होती. केवळ ख्रिश्चन-कॅथलिकच नाही तर सर्वांचेच लक्ष या निवडीकडे होते.
व्हॅटिकन सिटीने नवे पोप कोण असतील याची घोषणा केली आहे. मूळचे अमेरिकेचे असलेल्या रॉबर्ट प्रिव्होस्ट यांची कार्डिनलने नवे पोप म्हणून निवड केली आहे.
त्यांचे नाव 'लिओ - XIV' हे असेल. पोप यांची निवड झाल्यानंतर त्यांना त्यांचे नवीन नाव धारण करावयाचे असते. त्यांना 'पोप लिओ' या नावाने संबोधित केले जाईल.
याआधी, नवीन पोप यांची निवड झाल्याचे संकेत व्हॅटिकन सिटीने दिले आहेत. व्हॅटिकनमध्ये असलेल्या चिमनीतून पांढऱ्या रंगाचा धूर निघाला आणि उपस्थित लोकांना जल्लोष केला. हे नवीन पोपची निवड झाल्याचे संकेत असतात.
पोप लिओ यांनी व्हॅटिकनच्या गॅलरीत येऊन सर्वांना अभिवादन केले आणि त्यांनी आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली. त्यांनी आशीर्वचन दिले आणि दिवंगत पोप फ्रान्सिस यांचे आभार मानले.
व्हॅटिकन सिटीच्या आवारात हजारोच्या संख्येनी लोक जमा झाले आहेत. त्यांना पोप लिओ यांनी संबोधित केले.
ईश्वराचे आपल्या सर्वांवर निर्व्याज प्रेम आहे. सर्व मानवतेला येशूची गरज आहे. ईश्वर आणि त्याच्या प्रेमाचा सेतू हा येशूच आहे. एकमेकांना मदत करा आणि प्रेमाचे सेतू बांधा असा संदेश त्यांनी यावेळी दिला.
ईश्वराने आपल्या सर्वांसाठी निर्माण केलेल्या निवासाकडे आपण सर्वजण मिळून जाऊया.
पोप लिओ यांच्या कारकिर्दीची सुरुवात पेरूमधून झाली. पोप लिओ हे बहुभाषिक आहेत. त्यांनी आपल्या साथीदारांचे आभार स्पॅनिशमधून मानले.
पोप यांची निवड कार्डिनलद्वारे होत असते. 133 सदस्य असलेल्या कार्डिनलकडून पोप यांची निवड होते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)