Pune News : माणिकबागेतील चौपाटीवर महापालिकेची कारवाई
esakal May 09, 2025 04:45 AM

पुणे : सिंहगड रस्त्यावरील माणिकबागेत गोयलगंगा रस्त्यावरील चौपाटीवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने आज कारवाई केली. या भागातील नागरिकांच्या तक्रारी येत असल्याने ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत ६ हजार चौरस फुटावरील शेड, पक्के बांधकाम पाडून टाकण्यात आले.

सिंहगड रस्त्यावर शिवा काशीद चौकापासून ते सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयापर्यंतच्या रस्त्यावर दुतर्फा अतिक्रमणे झालेली आहे. दुकानांच्या समोर मोठी जागा आहे, पण गाड्या लावण्यासाठी ही जागा मोकळी सोडणे आवश्यक पण पण या जागेत चौपाटी थाटण्यात आली आहे. या रस्त्यावर सुमारे ५० दुकाने असून, प्रत्येकाने दुकानासह समोरच्या मोकळ्या जागेत दाक्षिणात्य खाद्य पदार्थांसह चायनीज, भेळ, पाणीपुरी यासह अन्य पदार्थांचे स्टॉल लावले आहेत. खुर्च्या व टेबल टाकून ही जागा व्यापून टाकली आहे. तसेच दुपारपासून रात्री उशिरापर्यंत येथे भरपूर गर्दी असल्याने स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोडीही होत आहे. त्यामुळे येथील नागरिकांकडून तक्रारी केल्या जात आहेत.

महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्या आदेशानुसार अतिक्रमण निर्मूलन विभाग, बांधकाम विभागातर्फे संयुक्त कारवाई करण्यात आली. गोयल गंगा रस्त्यासह पादचारी मार्ग, इमारतीचे फ्रंट व साइड मार्जिन मधील अनधिकृत अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली .

अतिक्रमण निर्मूलन विभागचे उपायुक्त संदीप खलाटे, उप अभियंता राजेश खाडे, क्षेत्रीय अतिक्रमण निरीक्षक संजय जाधव,श्रीकृष्ण सोनार, कनिष्ठ अभियंता मयूर गेडाम, अतिक्रमण निरीक्षक अविनाश धरपाळे यांच्यासह १४ सहाय्यक अतिक्रमण निरीक्षकांनी कारवाईत सहभाग घेतला. यावेळी पोलिस कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी, ५५ बिगारी, सेवक कारवाईत सहभागी झाले होते.

या कारवाईमध्ये ६ हजार चौरस फुटावरील कच्चे,पक्के शेड काढून टाकले, तसेच टेबल,खुर्च्या, तंबू, काऊंटर यासह अन्य पथारी साहित्य असे ६ ट्रक साहित्य जप्त केले, अशी माहिती खलाटे यांनी दिली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.