भारत-पाकिस्तान यांच्यात गेल्या 2 दिवसांपासून एकमेकांवर ड्रोन हल्ले सुरु आहेत. भारत-पाकिस्तान यांच्यातील या वाढत्या तणावाचा परिणाम क्रिकेट स्पर्धांवरही झाला आहे. दोन्ही देशातील आयपीएल (IPL 2025) आणि पीएसएल (PSL 2025) स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयपीएलच्या 18 व्या मोसमातील उर्वरित सामने हे आठवड्याभरासाठी स्थगित करण्यात आले आहेत. त्यामुळे उर्वरित सामने केव्हा होणार? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. आता या उर्वरित सामन्यांच्या वेळापत्रकाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
आयपीएलचा 18 वा मोसम सुरक्षिततचेच्या कारणामुळे स्थगित करण्यात आला आहे. या मोसमातील 57 सामने यशस्वीरित्या खेळण्यात आले. मात्र 8 मे रोजी पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यातील सामना (58 वा सामना) हा फलड्स लाईट्समुळे रद्द करण्यात आला. त्यानंतर आता उर्वरित सामने आठवड्याभरासाठी स्थगित करण्यात आल्याची माहिती आयपीएलकडून एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन देण्यात आली आहे. त्यामुळे आता एकूण 16 सामने होणं बाकी आहेत. हे सामने केव्हा होणार? याबाबतची अपडेट जाणून घेऊयात.
“आयपीएलचा 18 वा मोसम एक आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. त्यानंतर सद्य परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर संबंधित यंत्रणांसह चर्चा केली जाईल. त्यानंतर स्पॉन्सर, फ्रँचायजी आणि ब्रॉडकास्टर्ससह चर्चा करुन उर्वरित सामन्यांचं वेळापत्रक जाहीर केलं जाईल”, अशी माहिती बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिली.
आयपीएल 2025 आठवड्यासाठी स्थगित