परभणी : परभणीच्या जलतरण तलावात बुडून एका ५५ वर्षीय व्यक्तीचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज परभणीत घडलीय. शहरातील मोहमदिया मशीद परिसरात राहणारे असलम खान हे आज रोजच्याप्रमाणे आपल्या मित्रांसमवेत जलतरण तलावात पोहण्यासाठी आले होते. मात्र काही वेळाने ते दिसेनासे झाले. त्यामुळे मित्रांनी त्यांना शोधायला सुरुवात केली. तब्बल ३ तास जलतरण तलावात कर्मचाऱ्यांनी शोधल्यानंतर त्यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. दरम्यान, महानगरपालिकेनं जलतरण तलाव हे खासगी तत्वावर चालवण्यास दिलं आहे. काही वर्षांपूर्वी असाच एक तरुणाचा या तलावात मृत्यू झाला होता. त्यानंतर आजही तशीच घटना घडलीय, त्यामुळे यावर लक्ष देण्याची मागणी सगळीकडून केली जातेय.
उन्हाळा सुरू असल्याने सध्या बरेचजण नदी, तलाव, स्विमिंग पूल आणि इतर ठिकाणी पोहोण्यासाठी नागरिक गर्दी करताना दिसून येतात. मात्र, सुरक्षेच्या अभावाशिवाय पोहण्यास उतरणे जीवावर बेतू शकते. विशेष म्हणजे महापालिकेच्या झाल्याने तेथील सुरक्षेवर प्रश्न निर्माण झालं आहे. पाण्यात उतरणाऱ्या व्यक्तींना सेफ जॅकेट का दिलं जात नाही? त्यांच्या सुरक्षेसाठी सेफ गार्ड जलतरण परिसरात का नव्हतं? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे, जलतरण तलावाचा ठेका घेतलेल्या संबंधित ठेकेदारावर कारवाई होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.