विश्रांतवाडी : येरवडा परिसरातील तारकेश्वर पुलाला पुन्हा भगदाड पडले. त्यामुळे येथील वाहतूक बंद ठेवण्यात आली. त्यामुळे दुसऱ्या बाजूने वाहतूक कोंडी झाली. जवळ जवळ दोन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. येथील वाहतूक इतर मार्गानी वळविण्यात आली.
आधी या पुलावर मध्यभागी जॉईंटपाशी गेल्या शनिवारी भगदाड पडल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे या आठवड्यात त्याची दुरुस्ती तीन वेळा करण्यात आली. मात्र अवघ्या काही तासात त्यांवरून मोठ्या वजनाच्या गाड्या जाऊन जाऊन पुन्हा पुन्हा काँक्रीट खाली पडून पुन्हा भगदाड पडत होते. तेव्हा केलेले काँक्रीट सुकायला किमान२४ तास तरी देऊन हा रस्ता बंद ठेवायला हवा होता. पण तसे न झाल्याने आज पुन्हा भगदाड पडले. वाहतूक खात्याने सहकार्य न केल्याने ही परिस्थिती उद्भवली.
यासंदर्भात येरवडा वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक पी. पी. खेडकर म्हणाले की पुलाच्या दुरुस्तीचे काम झालेलं असल्याने ते काम वाळणे आवश्यक असल्याने वाहतूक वळविण्यात आली आहे. उद्यासुद्धा पूल बंद राहील. तरी नागरिकांनी इतर पर्यायी रस्त्याचा वापर करून सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.