संदीप भोसले, लातूर प्रतिनिधी
Indian soldier leaves for duty emotional farewell : भारत आणि पाकिस्तान सीमेवर युद्धाची स्थिती निर्माण झाली आहे. पाकड्यांकडून जम्मू काश्मी, राजस्थान, पंजाब या राज्यांवर ड्रोन हल्ला करण्यात येत आहे. भारताकडून पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याचे प्रत्युत्तर दिले जात आहे. पाकिस्तानच्या नापाक हरकती पाहून भारताकडून युद्धाची तयारी करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर सुट्टीवर असलेल्या सर्व जवानांना भारताने ड्युटीवर परत बोलवले आहे. त्यामुळे सुट्टीवर अलेले जवान पुन्हा एकदा कर्तव्यावर परत निघाले आहेत. कंठ दाटून कुटुंबियांना निरोप दिला जात आहे. लातूरमधील एका जवानाचीही अवस्था काहीशी तशीच झाली आहे. कैलास सूर्यवंशी हे सुट्टीवर गावी आले होते, पण सीमेवर तणावाची स्थिती निर्माण झाल्यामुळे त्यांना परत जावं लागले. मुलाचा पहिला वाढदिवस असल्याने ते सुट्टीवर आले होते, पण त्याच दिवशी त्यांना पुन्हा घर सोडावे लागत आहे. सूर्यवंशी यांना निरोप देताना कुटुंबियांच्या अश्रूचा बांध फुटला.
तणावाच्या पार्श्वभूमीवर देशातल्या सर्व जवानांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. लातूरच्या औसा तालुक्यातील जावळी गावचे कैलास सूर्यवंशी हे जवान आपल्या मुलाच्या पहिल्या पहिल्या वाढदिवस आणि लग्नाचा वाढदिवसासाठी ४५ दिवसांच्या सुट्टीवर आले होते. पण सीमेवर तणाव वाढला अन् तातडीने हजर राहण्याचा कॉल आला.
कैलास यांना अचानक रुजू होण्यासाठी कॉल आला. त्यामुळे ते आज आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी लातूर वरून निघाले. राजस्थानच्या बिकानेर या ठिकाणच्या बॉर्डरवर त्यांची ड्युटी आहे. कैलास यांना निरोप देताना वडिलाचे डोळे पाणावले होते.
कैलास हे 2014 मध्ये भारतीय सेवेत दाखल झाले होते. राजस्थानच्या बिकानेर या ठिकाणी सध्या त्याची नियुक्ती आहे. ४५ दिवसाची सुट्टी मंजूर करून हा जवान आपल्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला आणि लग्न वाढदिवसासाठी गावी आले होते. पण सीमेवर तणाव वाढला, त्यामुळे सुट्टी रद्द झाली. अकरा दिवसाच्या सुट्टीनंतर तात्काळ ते देशासाठी गेले आहेत.
बिकानेर सीमेवर सध्या तणावपूर्ण परिस्थिती आहे. पाकिस्तानी ड्रोन आणि गोळीबाराच्या घटनांमुळे भारतीय सैन्य उच्च सतर्क आहे. कैलास यांच्यासारखे जवान देशाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटत आहेत. या भावनिक प्रसंगाने गावकऱ्यांनाही जवानांच्या त्याग आणि समर्पणाची जाणीव झाली. स्थानिकांनी त्यांना शुभेच्छा देत मातृभूमीच्या रक्षणासाठी शक्ती दिली.