India Pakistan War : भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांदरम्यान सुरु असलेल्या संघर्षावर आणि आयपीएलवर आता टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनं आपली भूमिका मांडली आहे. ही युद्धजन्स परिस्थिती जास्त काळ टिकणार नाही, असं भाकितही त्यानं केलं आहे.
सौरव गांगुली म्हणाला, सध्या भारत-पाकिस्तान दरम्यान युद्धजन्य परिस्थिती तयार झाली आहे. त्यामुळं आयपीएलमध्ये अनेक परदेशी खेळाडू सहभागी झालेले आहेत, तर बीसीसीआयनं ही स्पर्धा थांबवली ते योग्यचं केलं. पण लवकरच आयपीएल सुरु होईल अशी आपण आशा करुयात कारण आता तर आयपीएलच्या महत्वाचे सामने होणार आहेत ते पूर्ण होतील.
बीसीसीआय आयपीएल पूर्ण करु शकेल का? या प्रश्नावर उत्तर देताना गांगुलीनं म्हटलं की, नक्कीच बीसीसीआय ही आयपीएल स्पर्धा पूर्णत्वास नेईल. ही युद्धजन्य परिस्थती जास्त काळ टिकणार नाही. कारण भारताचा दबाव पाकिस्तान जास्त काळ झेलू शकणार नाही. त्यामुळं बीसीसीआयला हे करावच लागणार होतं, विशेषतः धर्मशाळा, चंदीगड, दिल्ली, राजस्थान, जयपूर ही सगळी आयपीएलच्या स्पर्धेची ठिकाणं आहेत. तसंच काल रात्री ज्या पद्धतीनं या सीमाभागात पाकिस्तानकडून हल्ले झाले त्यामुळं आयपीएल थांबवणं तर गरजेचं होतंच. त्यामुळं काळाप्रमाणं सर्वकाही व्यवस्थित होईल आणि सामने देखील पार पडतील.
दरम्यान, कोविडच्या काळातही आयपीएलची स्पर्धा थांबली होती पण ती नंतर घेण्यात आली होती. त्यामुळं बीसीसीआय ही खूपच कार्यक्षक संस्था आहे, ती आयपीएलचे सामने पुन्हा नक्कीच घेईल.