Snake Bite : महाविद्यालयीन तरुणीचा सर्पदंशाने मृत्यू; वेळेवर उपचार मिळाले नसल्याचा नातेवाइकांचा आरोप
esakal May 18, 2025 04:45 AM

चाकण - आडगाव (ता. खेड) येथील प्रांजल तुकाराम गोपाळे (वय १७) या महाविद्यालयीन तरुणीचा सर्पदंशानंतर वेळेवर उपचार न मिळाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. पाईटच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात वेळेवर उपचार न मिळाल्याने, तसेच योग्य सुविधा न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला, असा आरोप तिच्या नातेवाइकांनी केला आहे.

याबाबत मृत तरुणीच्या वडिलांनी महाळुंगे पोलिसांत तक्रार अर्ज दिला आहे. त्यानुसार महाळुंगे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन गिते यांनी माहिती दिली, की प्रांजल हिला तिच्या घराजवळ शुक्रवारी (ता. १६) सकाळी नऊच्या सुमारास सर्पदंश झाला. त्यानंतर तिला प्राथमिक उपचारांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र पाईट येथे आणले.

त्यावेळी आरोग्य केंद्रात सर्पदंशाची लस, तसेच डॉक्टर उपलब्ध नव्हते. त्यामुळे तीला उपचारासाठी चांडोली (राजगुरुनगर) येथे सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. त्या रुग्णालयात लस उपलब्ध नव्हती. त्यामुळे तिच्यावर प्राथमिक उपचार करून तिला रुग्णवाहिकेतून उपचारासाठी यशवंतराव चव्हाण रुग्णालय पिंपरी येथे नेण्यात आले.

त्या रुग्णवाहिकेत अत्यावश्यक सुविधा, तसेच रुग्णालयाचा कर्मचारी सोबत नव्हता. तसेच, इतर रुग्णालादेखील त्याच रुग्णवाहिकेतून नेण्यात आले. प्रांजल हिचा रुग्णवाहिकेतच दुर्दैवी मृत्यू झाला. महाळुंगे पोलिस ठाण्यात प्रांजलच्या मृत्यूची दप्तरी नोंद सर्पदंशाने मृत्यू, अशी केली आहे.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आरोप फेटाळले

याबाबत पाईट प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी सोनम रणवीर यांनी सांगितले की, ज्यांनी आरोप केलेला आहे, ते रुग्णाचे नातेवाईक रुग्णाला उपचारासाठी पाईट येथील आरोग्य केंद्रात घेऊन आले नाहीत. आम्ही आरोग्य केंद्रातच होतो. तसेच इतर कर्मचारी होते. या आरोग्य केंद्रात सर्पदंशावरील लस उपलब्ध होती. त्यांचे आरोप चुकीचे आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.