>> दिलीप ठाकूर
मराठी कलाकाराला हिंदीतील सेलिब्रिटीजसोबत जाहिरातीत काम करण्याचा आनंद भन्नाट वाटत असतो. तो लाईव्ह अनुभव ठरतो. मराठी कलाकाराला हिंदीतील एखादा कलाकार वा स्टार क्रिकेटपटूसोबत झळकण्याची संधी मिळाली की, आनंद होणे स्वाभाविक आहे. शिवाय ही जाहिरात अनेक भाषांत डब होत दूरदूरच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचता येते. असा हा लाइव्ह अनुभव छोटासा असला तरी त्याचा आनंद नक्कीच मोठा आहे.
तसं पाहिलं तर जाहिरात अवघ्या काही सेकंदांची वा मिनिटभर असते. (चिमूटभर म्हटले तर ाr चालेल.) तेवढय़ातही हिंदीतील एखादा कलाकार वा स्टार क्रिकेटपटूसोबत झळकण्याची संधी मिळाली की, मराठी कलाकाराला मनसोक्त आनंद होणे स्वाभाविक आहे. एका भाषेतील जाहिरात अनेक भाषांत डब झाल्याने दूरदूरच्या प्रेक्षकांपर्यंत जाता येते हा मोठाच बोनस गुण. ती एक जाहिरात मुद्रित माध्यम, रस्त्यावर, दूरचित्रवाणी (उपग्रह वाहिनी), सिंगल क्रीन थिएटर्स, मल्टिप्लेक्स, डिजिटल अशी अनेक माध्यमांतून दिसत असल्याने तर त्या मोठय़ा सेलिब्रिटीजसोबत आपला मराठी कलाकारही दिसत असतो.
विराट कोहली, कुणाल पांडय़ासोबत श्रुती मराठेला एका जाहिरातीत चमकायला मिळाले हे ताजे उदाहरण. एवढय़ा मोठय़ा क्रिकेटपटूंना प्रत्यक्षात पाहता यावे, औपचारिक का होईना, पण बोलता यावे, त्यासोबत सेल्फी निघालाच तर सोशल मीडियात भरभरून लाईक्स नक्कीच! अशी सुखावणारी बेरीज आहेच. पूजा सावंतला एका ज्वेलर्सच्या जाहिरातीत अमिताभ बच्चन, कतरिना कैफसोबत चमकायची संधी मिळाली ही चक्क सोशल मीडियात बातमी झाली. विजय गोखलेचा ‘कौन बनेगा करोडपती’च्या प्रमोशनल जाहिरातीत अमिताभसोबत काम करण्याचा अनुभव अगदी वेगळाच. गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीत (फिल्म सिटी) या जाहिरातीचे शूटिंग असताना ट्रफिक जाममध्ये अडकल्याने अमिताभ वेळेवर पोहोचू शकेल का? याची असलेली शंका अमिताभ नेहमीप्रमाणेच वेळेवर आल्याने दुरावली. तेव्हा ते एका चित्रपटाच्या सेटवरून थेट आल्याने त्याच्या कपडय़ांना चिखल लागला होता. अमिताभ यांनी गमतीत विचारले, ‘असं चालेल का?’ सेटवरचे वातावरण नॉर्मल ठेवण्यात अमिताभ हुशार आणि या अनुभवावर आजही विजय गोखले भरभरून बोलतो.
मृणाल कुलकर्णीलाही आपण एका जाहिरातीत अमिताभसोबत पाहतो. अमेय हुस्नवाडकरचा सलमान खानसोबत जाहिरातीत काम करण्याचा अनुभवही असाच भन्नाट. श्याम माशाळकर याच्यापासून अनेक मराठी कलाकार हिंदीतील सेलिब्रिटीजसोबत जाहिरातीत चमकले. नुसती नावे घ्यायची तर केवढी तरी होईल. एकीकडे सेलिब्रिटी जेवढा मोठा तितकी सिक्युरिटी, स्पॉटची तपासणी, त्याचा गोतावळा केवढी तरी. त्याच्या मोठेपणाचा दबाव येऊ न देण्याइतपत मराठी कलाकार व्यावसायिक नक्कीच आहेत. अर्थात, थोडेसे आकर्षण असणारच आणि ते हवेच.
जाहिरातीचे विविध अँगलने शूटिंग होत असल्याने रिटेकही जास्त. तेवढाच सेलिब्रिटीजचा सहवास जास्त. म्हटले ना, जाहिरात दिसते छोटी, पण त्यात हिंदीतील सेलिब्रिटीजसोबत काम करण्याचा मराठी कलाकाराला आनंद भन्नाट असतो. तो लाईव्ह अनुभव ठरतो. मनोरंजन क्षेत्रातील हीदेखील एक छान गोष्ट. अधिकाधिक मराठी कलाकारांना अशीच हिंदीतील सेलिब्रिटीजसोबत जाहिरातीत काम करण्याची संधी मिळू दे. त्यातून मिळणारी ऊर्जा बरेच दिवस पुरणारी व आपल्या कामातील रस वाढवणारी असते. कळत नकळतपणे हे खूपच मोठे देणे आहे.
(लेखक सिनेपत्रकार व समीक्षक आहेत