ऊर्जादायी मैत्री!
esakal May 10, 2025 09:45 AM

सुहृद वार्डेकर आणि रसिका वाखारकर

‘कलर्स मराठी’वरील ‘अशोकमामा’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारी ‘भैरवी’ आणि ‘अनिश’ ही जोडी मालिकेबाहेरही एकमेकांशी मैत्रीचं घट्ट नातं जोडून आहे. या दोघांची पहिली ओळख मालिकेच्या ‘लूक टेस्ट’दरम्यान झाली. पहिल्याच भेटीत संवादाने इतकी सहजता गाठली, की मैत्रीचा एक बंध तयार झाला. अभिनयाच्या प्रवासात एकत्र काम करताना निर्माण झालेलं हे नातं आज त्यांच्या आयुष्यातील मौल्यवान नात्यांपैकी एक झालं आहे.

रसिका सांगते, “लूक टेस्टच्या वेळी आम्ही खूप मोकळेपणाने बोललो. अशा ‘प्रोफेशनल सेटअप’मध्ये पहिल्याच भेटीत इतका सहज संवाद साधणं माझ्यासाठी नवीन होतं. त्यानंतर आमच्यातली ओळख हळूहळू छान मैत्रीत रूपांतरित झाली.”

सुहृदसाठी या मैत्रीचा उगम संगीतात आहे. तो सांगतो, “मी सेटवर आल्यावर मेकअप करताना स्पीकरवर गाणी लावतो. ही माझी सवय रसिकालाही आवडली. तीसुद्धा माझ्यासह गाणी ऐकत आपल्या कामाचा आनंद घेऊ लागली. तिथून आमचं नातं अधिक घट्ट झालं. गाणी ऐकत ऐकत कधी छान मैत्री झाली, ते कळलंच नाही.”

एकमेकांच्या स्वभावाचे गुण सांगताना दोघे भरभरून बोलतात. रसिका सांगते, की सुहृद अत्यंत हसतमुख आहे. तो उत्साहाने काम करतो आणि त्याची ही सकारात्मक ऊर्जा संपूर्ण सेटवर पसरते. ‘‘कधी सगळ्यांना थकल्यासारखं वाटत असेल, तर तो स्वतःहून सर्वांसाठी त्यांच्या आवडीची कोल्ड्रिंक्स ऑर्डर करतो. सगळ्यांचा मूड ताजातवाना होईल असं पाहतो. त्याचं हे सहज आनंद देणं मला खूप आवडतं.’’

सुहृदला मात्र रसिकाची एक वेगळीच बाजू भावते. तो सांगतो, ‘‘ती नेहमी स्वतःच्या विचारांत असते. पण त्याच वेळी इतरांशी मिळून-मिसळून राहते. आजच्या काळात सगळे दुसऱ्याच्या आयुष्यात डोकावत असतात. तेव्हा स्वतःची ‘स्पेस’ जपणं आणि तरीही सुसंवाद ठेवणं, ही एक कलाच आहे. शिवाय, ती सेटवर नेहमी ‘अप-टू-डेट’ दिसण्यासाठी काळजी घेते. त्यातून शिकावं असं मला वाटतं. कॅमेऱ्यासमोर नीट दिसणं हेही अभिनयाइतकंच महत्त्वाचं असतं.’’

मैत्रीची व्याख्या करताना रसिका स्पष्टपणे म्हणते, ‘‘मैत्रीत पारदर्शकता हवी. एकमेकांशी मोकळेपणानं बोलणं. कोणतीही ‘भूमिका न वठवता’ नातं टिकवणं, ही खरी मैत्री.”

सुहृदसाठी मैत्री म्हणजे संगीत! ‘‘संगीत आपल्याला सावरण्याचं काम करतं, तसंच मित्रांचंही असतं. ते आपल्याला वाईट ‘मूड’मधून बाहेर काढून पुन्हा ‘नॉर्मल’ आयुष्यात आणतात. ही खरी मैत्री आहे.”

आजच्या धकाधकीच्या जगात नात्यांमध्येही दिखावा वाढलाय असं आपण म्हणतो. तिथे सुहृद आणि रसिकासारखी मैत्री एक सच्च्या आणि निखळ नात्याचा आदर्श ठरते. एकमेकांप्रती असलेला आदर, सहजपणा आणि समजूतदारपणा यामुळे ही मैत्री खऱ्या अर्थाने ‘रेशीमनातं’ ठरते.

(शब्दांकन : मयूरी गावडे)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.