22 एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताला दहशतवादविरोधी मोठे यश मिळाले आहे. या लष्करी कारवाईत सुमारे 100 दहशतवादी मारले गेले, ज्यात कुख्यात आणि मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अब्दुल रौफ अझहरचाही समावेश होता. अब्दुल रौफ हा तोच दहशतवादी आहे जो 1999 सालच्या आयसी-814 अपहरण प्रकरणात सहभागी होता आणि ज्याच्या भूमिकेमुळे दहशतवादी अहमद उमर सईद शेखची सुटका झाली होती. त्याच दहशतवाद्याने 2002 मध्ये अमेरिकन-ज्यू पत्रकार डॅनियल पर्लचे अपहरण करून हत्या केली होती.
ऑपरेशन सिंदूरमध्ये अब्दुल रौफ अझहर मारला गेल्यानंतर, दुसऱ्या दिवशी त्याच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहून आणि शोक व्यक्त करणाऱ्या पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर या मुद्द्याबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधण्यात आले.
डॅनियल पर्लचे वडील, ज्यूडियन पर्ल यांनी शुक्रवारी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट लिहीत कडक टीका केली. ” तुम्ही खरोखर कशासाठी शोक करत आहात? तुम्ही तुमच्या मुलांना कोणत्या आदर्शांचा आदर करायला शिकवत आहात? या माणसाकडून तुम्ही काय शिकलात? हे या मान्यवरांनी आम्हाला सांगावे ” असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला.
डॅनियल पर्ललाही मिळाला न्याय
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवाद्यांना लक्ष्य करून, केवळ पहलगाम हल्ल्यातील पीडितांनाच नव्हे तर आयसी-814 अपहरण आणि डॅनियल पर्लच्या हत्येतील पीडितांनाही न्याय मिळाला, असे भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी शुक्रवारी सांगितले.ऑपरेशन सिंदूर अंतर्गत झालेल्या या कारवाईत नष्ट झालेल्या नऊ दहशतवादी संरचनांपैकी एक बहावलपूरमध्ये देखील आहे, जो जैश-ए-मोहम्मदचा एक प्रमुख तळ मानला जातो आणि पर्लच्या हत्येत सहभागी असलेले दहशतवादी तेथूनच काम करत होते.
बहावलपूरवर भारतीय हवाई हल्ला
बहावलपूरवरील प्रत्युत्तराची कारवाई ही केवळ लष्करी कारवाई नव्हती तर आंतरराष्ट्रीय दहशतवाद केंद्र नष्ट करण्यासाठी तो एक धोरणात्मक पुढाकार होतो, असे मिस्री म्हणाले.डॅनियल पर्लच्या हत्येसाठी जैश-ए-मोहम्मद आणि त्याच्याशी संबंधित संस्था प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जबाबदार आहेत, असे ते म्हणाले. बहावलपूरवरील कारवाई ही या क्रूर हत्येला योग्य आणि आवश्यक प्रतिसाद आहे.
विशेष म्हणजे, बहावलपूर हा जैश-ए-मोहम्मदचा बालेकिल्ला मानला जातो. संयुक्त राष्ट्रांनी जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केलेला मसूद अझहर हा त्याचे नेतृत्व करतो.