मुंबई - कोरोना काळातील खिचडीवाटप गैरव्यवहारात आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवारी अमोल कीर्तिकर, सूरज चव्हाण, सुजित पाटकर, सुनील उर्फ बाळा कदम यांच्यासह आठ आरोपींविरोधात दंडाधिकारी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. हे सर्वजण शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील प्रमुख नेत्यांचे निकटवर्तीय मानले जातात.
कीर्तिकर यांनी ठाकरे यांच्या शिवसेनेतर्फे लोकसभा निवडणूक लढवली होती. सक्तवसुली संचालनालयानेही (ईडी) यातील काही आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. खिचडीवाटपाचे कंत्राट मिळविण्यास पात्र नसताना राजकीय वलय वापरून आरोपींनी ते मिळवले.
नियम धाब्यावर बसवून ३०० ऐवजी १०० ते २०० ग्रॅम खिचडीचे वाटप केले, खिचडीची पाकिटे जास्त दरात विकत घेऊन त्याबदल्यात महापालिकेकडून अधिक रक्कम उकळली, या कटकारस्थानावर पडदा पडावा म्हणून खोटी कागदपत्रे तयार केली गेली, असे आरोप आर्थिक गुन्हे शाखेने आरोपींवर ठेवले आहे. आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या आरोपपत्रात आरोपींनी कोरोना काळातील या कंत्राटात गैरव्यवहार करून १४.५४ कोटी रुपये गैरलाभाने कमावल्याचा दावा केला आहे.
निकषांचे उल्लंघन
आरोपींनी खिचडीवाटप योजनेबाबत महापालिकेचे नियम, निकषांबाबत अंधारात ठेवून (करार न करता) ‘स्नेहा केटरर्स’च्या संजय माळी यांच्याकडून खिचडी बनवून घेतली. मात्र चौकशी सुरू झाली तेव्हा आरोपींनी बनावट कागदपत्रे पुढे केली, असा दावाही आर्थिक गुन्हे शाखेने केला आहे.