सेनापती कापशी : वडगाव (ता. कागल) येथे पत्नीने प्रियकराच्या मदतीने शेतकरी पतीचा खून केल्याचे आज उघड झाले. शिवाजी बंडू शिंदे (वय ४७, रा. वडगाव) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांची आई शकुंतला बंडू शिंदे यांनी मुरगूड (Murgud Police) याबाबत फिर्याद दिली. पोलिसांनी आठ तासांत खुनाचा छडा लावला. शिवाजीची पत्नी कांचन शिवाजी शिंदे (वय ४५) आणि तिचा प्रियकर चुलत दीर चंद्रकांत धोंडिबा शिंदे (वय ४४) यांना ताब्यात घेतले.
याबाबत अधिक माहिती अशी, काल सकाळी साडेसहाच्या सुमारास शिवाजी शिंदे हे वडगाव ते माद्याळ रस्त्यावरील काशी नाका येथे मृत अवस्थेत आढळून आले. त्यांच्या डोक्याला व चेहऱ्यावर मारहाणीच्या जखमा होत्या. ते सध्या वडगाव येथे शेती करत होते. यापूर्वी ते सेनापती कापशी येथे हॉटेलमध्ये काम करायचे. काल रात्री येथील विठ्ठल मंदिरात एकादशीनिमित्त भजन सुरू होते. त्यावेळी साडेनऊच्या सुमारास ते या मंदिर परिसरात लोकांना दिसले होते.
त्यानंतर त्यांचा चुलत भाऊ चंद्रकांत धोंडिबा शिंदे याच्या दुचाकीवरून पत्नी कांचन शिंदे हिच्या पिंपळगाव (ता. भुदरगड) येथील माहेरी गेले. त्यानंतर शिवाजी शिंदे हे आज सकाळी साडेसहाच्या सुमारास काशी नाका येथे मृतावस्थेत आढळले. शिवाजी याने स्थानिक बचत गटाच्या महिलांकडून पैसे घेतले होते. ते तो परत करीत नव्हता. यामधून शिवाजी व पत्नी कांचन यांच्यामध्ये वारंवार वाद होत होते.
त्याचा राग मनात धरून पत्नीने अनैतिक संबंध असलेला तिचा चुलत दीर चंद्रकांत शिंदे याची मदत घेऊन पतीच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर लाकडाने मारहाण करून जखमी केले आणि माद्याळ ते वडगाव दरम्यानच्या काशी नाका येथे रस्त्यालगत मृतदेह टाकून अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव केला.
शिवाजी यांना दोन विवाहित मुली आणि नोकरीनिमित्त बाहेरगावी असलेला एक अविवाहित मुलगा आहे. पत्नी माहेरी असल्याने सध्या ते वडगाव येथे एकटेच राहत होते. त्यांचे आई-वडील कापशी येथे राहतात. सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी करे, प्रशांत गोजारे, बजरंग पाटील, राहुल देसाई अधिक तपास करत आहेत.