यंदा पालघर शहर पाण्याखाली जाणार, निविदा प्रक्रियेत नगर परिषदेची नालेसफाई रखडली
Marathi May 10, 2025 03:25 PM

पावसाळा सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक असताना पालघर नगर परिषदेच्या नालेसफाईला अद्याप मुहूर्त सापडला नाही. निविदा प्रक्रियेत नगर परिषदेची नालेसफाई रखडली आहे. नाल्याची सफाई वेळेत न झाल्यास यंदा पालघर शहर पूर्ण पाण्याखाली जाणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, ठेकेदारांकडून घाईघाईत हातसफाई होऊ नये याकडे प्रशासनाने लक्ष घालावे अशी मागणी पालघरवासीयांनी केली आहे.

पालघर नगर परिषदेअंतर्गत 14 प्रभाग असून जवळपास शेकडो लांबीचे नाले आहेत. बहुतांश प्रभागांमध्ये बंदिस्त गटार तर काही प्रभागांमध्ये अजूनही उघडी गटारे आहेत. पावसाळा सुरू होण्याआधी निविदा प्रक्रिया राबवून नालेसफाई व नाळ्यातील गाळ काढणे अपेक्षित असताना ही प्रक्रिया लांबली आहे. त्यातच एप्रिल 2024 मध्ये नगर परिषदेच्या कार्यकारिणीचा कार्यकाळ समाप्त झाला असून प्रशासक राजवट सुरू आहे. दरम्यान, प्रशासक नगर परिषदेच्या नालेसफाईच्या कामांवर लक्ष देत नसल्याचे आरोप स्थानिकांनी केला आहे.

आरोग्य विभागामार्फत 2023 मध्ये परेश कन्स्ट्रक्शन कंपनीला नालेसफाईचे काम एका वर्षासाठी दिले होते. मात्र हे काम परवडत नसल्याने ठेकेदाराने काम बंद केले.

नगर परिषदेने वारंवार पत्रव्यवहार करूनही या ठेकेदाराने यंत्रणा पुरवण्यात असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी माजी नगरसेवक यांनी केली आहे.

पालघर नगर परिषदमध्ये प्रभारी मुख्याधिकारी आहेत. नालेसफाई टेंडर प्रक्रियेमध्ये असून आता अंतिम टप्प्यात आहे. टेंडर प्रक्रिया पूर्ण करून तत्काळ नालेसफाई करण्याचे काम सुरू करण्यात येईल.
भूषण कबाडी, (आरोग्य विभागप्रमुख)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.