Special Vande Bharat Train for Punjab Kings & Delhi Capitals Players : ने गुरुवारी रात्री अचानक भारताच्या सीमाभागांवर हल्ला चढवल्यानंतर धर्मशाला येथील पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना रद्द केला गेला. बीसीसीआयने अत्यंत चतुराईने सर्व परिस्थिती हाताळली आणि फ्लडलाईटमध्ये बिघाड असल्याचे सांगून मॅच थांबवली. चेअरमन अरुण धुमाल व पंजाब किंग्सची मालकीण प्रीती झिंटा हे प्रेक्षकांना स्टेडियम रिकामी करण्याची विनंती करताना दिसले. विमानतळ बंद असल्याने खेळाडू, सपोर्ट स्टाफ, अम्पायर, ब्रॉडकास्टर टीम या सर्वांना दिल्लीत सुरक्षित घेऊन जाण्यासाठी बीसीसीआयने विशेष ट्रेनची सोय केली होती. हे सर्व खेळाडू सुखरूप दिल्लीत पोहोचले आहेत.
पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना गुरुवारी हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे सुरू होता. पंजाबने प्रथम फलंदाजी करून चांगली धावसंख्या उभी केली होती. पण, त्याचवेळी पाकिस्तानकडून जम्मू काश्मीर, राजस्थान, पंजाब या सीमावर्ती भागांमध्ये ड्रोन हल्ले सुरू झाले. त्यामुळे बीसीसीआयने अत्यंत सावधगीरीने ही मॅच रद्द केली. गोंधळाची किंवा भितीची परिस्थिती निर्माण होऊ न देता प्रेक्षकांना स्टेडियमबाहेर जाण्यास सांगितले गेले. त्यानंतर खेळाडूंना सुरक्षित ठिकाणी हलवले.
आयपीएल चेअरमन अरुण धुमाल म्हणाले, पहिल्या स्ट्रॅटेजिक टाईम आऊटच्या वेळी आम्हाला या हल्ल्याबाबतची माहिती दिली गेली. आम्हाला ब्लॅक आऊट नियम पाळण्यास सांगितले. आमच्याकडे वेळ होता, परंतु आम्ही दोन्ही संघांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना लगेच याची कल्पना दिली. थोड्या वेळात मैदानावरील लाईट्स बंद केल्या जातील, असे त्यांना सांगितले गेले आणि पुढील नियोजन काय असेल, हेही सांगितले.
ते पुढे सांगतात, हे सर्व नियोजन करत असताना खेळाडू घाबरतील असे काहीच होणार नाही, याची आम्ही काळजी घेतली. त्याशिवाय अन्य सदस्यांनाही विश्वासात घेतले.
दिल्ली कॅपिटल्सचा फिरकीपटू कुलदीप यादवने या सर्व प्रवासाबाबत सांगितले. बीसीसीआयने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. दरम्यान, आयपीएल एका आठवड्यासाठी स्थगित केली गेली आहे. आयपीएलचे १६ सामने शिल्लक आहेत आणि त्याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाईल.